समरजित घाटगेंनी राधानगरी धरणाची भूमी कलंकित करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:19 AM2021-06-25T04:19:08+5:302021-06-25T04:19:08+5:30
मुरगूड : मुरगूडच्या जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी-पाणी करायला लावणाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिवशी राधानगरीची भूमी कलंकित करू नये, ...
मुरगूड : मुरगूडच्या जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी-पाणी करायला लावणाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिवशी राधानगरीची भूमी कलंकित करू नये, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुरगूड शहरातील कार्यकर्त्यांनी केली आहे. एकीकडे राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेल्या मुरगूडच्या तलावातून जनतेला पिण्यासाठी पाणी देत नाहीत आणि दुसरीकडे राधानगरी धरणाच्या भूमीत शाहू महाराज जयंती साजरी करण्याची भाषा बोलतात. ही दुटप्पी भूमिका नाही का? असा सवाल या पत्रकातून विचारला आहे.
या पत्रकावर माजी नगराध्यक्ष प्रकाश चौगुले, नगरसेवक रविराज परीट, राष्ट्रवादीचे मुरगूड शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी, डॉ. सुनील चौगुले, कॉम्रेड अशोक चौगुले, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य राजू आमते, माजी नगरसेवक नामदेव भांदिगरे, संजय मोरबाळे, जगन्नाथ पुजारी, अमित तोरसे, प्रणव ऊर्फ विकी बोरगावे, नंदकिशोर खराडे, किरण चौगुले, समाधान चौगुले, आदी प्रमुखांच्या सह्या आहेत.
प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, राजर्षी शाहू महाराजांची जयंती उद्या, शनिवारी आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानाच्या शेतकऱ्यांसाठी स्वतःचा खजिना रिकामा केला व राधानगरी धरणाची पूर्तता केली. अशा महापुरुषाची जयंती काही लोक या धरणावर जाऊन साजरी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या गोष्टीला आम्हा मुरगूडकरांचा ठाम विरोध आहे. कारण छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज मुरगूडकरांना उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पाणी-पाणी करावयास लावतात, ही बाब शोभनीय नाही. हा तलाव मुरगूडकर जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठीच आहे. असे असताना शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज म्हणून घेणारे मात्र आपल्या शेतीसाठी पाण्याचा प्रचंड वापर करून, जनतेला मात्र पिण्यासाठी पाणी न देता त्यांना दाहीदिशा पाणी-पाणी करावयास लावत आहेत.
राजर्षी शाहू महाराज असते तर......
अशा परिस्थितीत छत्रपती शाहू महाराज हयात असते तर त्यांनी नदीवरून उसासाठी वेगळी पाण्याची योजना आणली असती आणि मुरगूडचा तलाव जनतेच्या मालकीचा केला असता. म्हणून अशा व्यक्तींनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीला राधानगरी धरणाची पवित्र भूमी कलंकित करू नये अशी विनंती केली आहे.