कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज पराक्रमात आणि राज्यकारभारात आपले पिता छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तसूभरही कमी नव्हते. त्यांचा थेट स्वभाव काहीजणांच्या दृष्टीने अडचणीत आणणारा असल्याने त्यांच्याबद्दल बखरीतून जाणीवपूर्वक बदनामीकारक लिखाण झाले. आता मात्र त्यांच्या चारित्र्यावरील हा डाग पुसला जात आहे. विशेषत: तरुणांना त्यांचा जाज्वल्य इतिहास अधिक आकर्षित करत आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. इस्माईल पठाण यांनी सोमवारी केले.
शहिद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जयंतीनिमित्त भवानी मंडपातील शेतकरी संघाच्या हॉलमध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी नोकर युनियनच्या वतीने आयोजित व्याख्यानात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासावर प्रकाशझोत टाकला. अध्यक्षस्थानी संघाचे ज्येष्ठ संचालक व्यंकाप्पा भोसले होते.
पठाण म्हणाले, संभाजी महाराजांचा स्वभाव रोकठोक होता. असा छत्रपती अष्टप्रधान मंडळातील काही प्रधानांना नको होता, तर सोयराबार्इंना राजाराम महाराजांना छत्रपती बनवायचे होते. या राजकारणातून छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामी केली गेली, तर नाटककार व कादंबरीकारांनी त्यात भर टाकली; त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मराठा इतिहासकारांनी सर्व कागदपत्रांचे संशोधन करून खरा इतिहास पुढे आणला. त्यात वा. सी. बेंद्रे, प्रा. डॉ. कमल गोखले व प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांचे मोलाचे योगदान आहे.
ते म्हणाले, संभाजी महाराजांवर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला. त्यांना ठार मारण्याचे कट रचले गेले. दुसरीकडे ते सलग नऊ वर्षे कुतुबशाही, आदिलशाही, मुघल, फ्रेंच, इंग्रज अशा सहा शत्रूंशी एकाकी लढत होते. त्यात औरंगजेबाचा समावेश होता. औरंगजेबाच्या सत्तेला शिवाजी महाराजांनी शह दिला होता, त्याचा राग त्याच्या मनात होता. अखेर स्वकियांनीच केलेल्या घातामुळे संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केले. महिनाभर हाल हाल करून महाराजांना मारले. तरीही संभाजी महाराजांनी औरंगजेबाला मुजरा केला नाही. स्वाभिमान जपला व हौतात्म्य पत्करले. त्यांचा हा इतिहास समजून घेण्याची गरज आहे.
व्यंकाप्पा भोसले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. दिलीप पवार यांनी व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला. दीपक निंबाळकर यांनी आभार मानले. यावेळी संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील भुयेकर, संभाजी जगदाळे, बी. एल. बरगे, सुभाष वाणी, अरुण पाटील, बाबूराव लाटकर, उमेश पानसरे, आदी उपस्थित होते.