Rajya Sabha Election: संभाजीराजेंची माघार शक्य!, दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 11:16 AM2022-05-26T11:16:10+5:302022-05-26T11:44:48+5:30
शिवसेना पक्षीय भूमिकेवर ठाम राहिली तर मग राज्यसभेच्या रिंगणातून बाहेर पडून महाराष्ट्रभर स्वराज्य संघटना बळकट करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. दोन दिवसांत ते यासंबंधीची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
विश्वास पाटील
कोल्हापूर : राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात येत असला तरी अजूनही हा शिवसेनेचा दबावतंत्राचा भाग समजला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून संभाजीराजे यांना संधी दिली जावी या हालचाली थांबलेल्या नाहीत. शिवसेना पक्षीय भूमिकेवर ठाम राहिली तर मग राज्यसभेच्या रिंगणातून बाहेर पडून महाराष्ट्रभर स्वराज्य संघटना बळकट करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. दोन दिवसांत ते यासंबंधीची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
बुधवारी दिवसभर संभाजीराजे यांच्या पातळीवर कोणतीही नवी घडामोड नव्हती. मुंबईत थांबून ते विविध लोकांच्या संपर्कात होते. शिवसेनेने मात्र एक पाऊल पुढे टाकत संजय पवार यांचा अर्ज दाखल करण्याची तयारी केली. त्यामुळे ही कोंडी कायम राहिली. तुमचा आम्ही जरूर सन्मान करू; परंतु तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा..तुम्हाला आमची मते तर हवीत आणि पक्षीय बांधीलकी नको हे कसे चालेल या भूमिकेवर शिवसेना ताठर आहे. त्यामुळेच त्यांनी हेतुपुरस्सर कोल्हापूरचा आणि त्यातही मराठा समाजाचा उमेदवार दिला आहे.
कोणत्याच पक्षाने पाठबळ दिले नाही तर संभाजीराजे यांच्यापुढे या लढतीतून माघार घेण्याशिवाय अन्य कोणताच पर्याय नाही. कारण उमेदवारी अर्जच दाखल करण्यासाठी दहा आमदार सूचक म्हणून लागतात. पक्षीय पाठबळ नसेल, तर हे आमदार आणणार कोठून, हा प्रश्नच आहे. महाविकास आघाडीत आठ, तर विरोधात भाजपकडे पाच अपक्ष आमदार आहेत.
लढायचेच झाले तर त्यांच्याशी पाठिंब्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल करावी लागेल, शिवाय विजयाची हमी नसताना अर्ज भरण्यातही काहीच हशील नाही. त्यामुळे एकतरी शिवसेनेचा पर्याय स्वीकारणे किंवा लढतीतून बाजूला होणे हेच दोनच पर्याय आजच्या घडीला त्यांच्यापुढे आहेत. त्यातून ते कोणत्या मार्गाने पुढे जातात यावर त्यांच्या राजकीय वाटचालीचीही दिशा ठरणार आहे. संभाजीराजे यांना भाजपने राष्ट्रपती कोट्यातून खासदार केले; परंतु त्यांच्या खासदारकीचा भाजपला पक्ष म्हणून काडीमात्र फायदा झाला नाही. हा अनुभव असल्यानेच शिवसेनेने पक्षीय उमेदवारीचा आग्रह धरला आहे.
शरद पवार यांच्यावर मर्यादा...
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यातून काही तोडगा काढतील का, अशीही चर्चा सुरू आहे; परंतु त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा आहेत. कारण ही जागाच शिवसेनेची आहे.
- मागील दोन वर्षांपूर्वी स्वत: पवार व फौजिया खान यांच्या राज्यसभेवरील निवडीवेळी शिवसेनेने पवार यांचा शब्द मानून आपली वाढीव मते त्यांना दिली आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळी काही भूमिका घेणे शक्य नाही.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव असा आहे की त्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते सहसा बदलत नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या बाजूने उमेदवारीचा विषय संपल्यात जमा आहे.