कोल्हापूर : शाहू छत्रपती यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार संभाजीराजे यांनी माजी सैनिकांच्या दवाखान्यासाठी ५0 लाखांचा निधी दिला. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा दवाखाना मोठा आधार ठरणार आहे.
लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नू आणि १०९ टी. ए. बटालियनचे कमांडिंग आॅफिसर कर्नल आर. एस. लेहल यांच्या उपस्थितीत एक्स सर्व्हिसमेन वेल्फेअर असोसिएशन लीगचे अध्यक्ष सुभेदार एन. एन. पाटील यांच्याकडे खासदार संभाजीराजे यांनी निधीबाबतचे पत्र दिले.
गेल्या महिन्यात छत्रपती संभाजीराजे फौंडेशनमार्फत सशस्त्र सेनाध्वज दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, कर्नल आर. एस. लेहल, परमपाल कौर लेहल यांच्यासोबत टेंबलाईवाडी येथील त्रिशक्ती स्थळावरील माजी सैनिकांच्या दवाखान्याची पाहणी केली होती. याठिकाणी अनेक अपुऱ्या सोयी-सुविधा, यंत्र सामुग्रीचा अभाव यामुळे संभाजीराजे व्यथित झाले. म्हणून माजी सैनिक आणि त्यांच्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या दवाखान्याच्या उभारणीसाठी निधी देण्याचा निर्णय संभाजीराजे यांनी घेतला. माजी सैनिक आणि त्यांच्या परिवाराच्या आरोग्यासाठी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे, अशा शब्दांत एस. एन. पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी मेजर जनरल पन्नू, कर्नल आर. एस. लेहल, परमपाल कौर लेहल, लेफ्टनंट लेआॅन, सुभेदार बाबू नाईक, सांगवडेकर, सुभेदार आनंदा पाटील, हवालदार संभाजी माने उपस्थित होते.
देशवासीयांसाठी सीमेवर रात्रंदिवस सेवा बजावून निवृत्त झाल्यानंतरही या माजी सैनिकांची आणि त्यांच्या परिवाराची काळजी घेणे हे मी माझे कर्तव्य समजतो. याच भूमिकेतून या माजी सैनिकांच्या दवाखान्यासाठी ५0 लाखांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.- संभाजीराजे छत्रपती, खासदार