विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात १९५२ पासून झालेल्या लोकसभेच्या १७ निवडणुकांमध्ये गेल्या वेळचे शिवसेना-भाजपचे उमेदवार संजय मंडलिक यांचे २ लाख ७० हजार ९२८ हे मताधिक्क्य आतापर्यंतचे सर्वांत जास्त आहे. याच मतदारसंघात १९७७ ला शे.का.प.चे दाजिबा देसाई विरुद्ध काँग्रेसचे शंकरराव माने यांच्यात लढत झाली. देसाई यांनी माने यांचा अवघ्या १६५ मतांनी पराभव केला होता. हे सर्वांत कमी मताधिक्य आहे. लोकसभेला देशभरात एवढ्या कमी मतांनी लागलेला निकाल हे दुर्मीळ उदाहरण असावे.
लोकसभेला २०१९ला राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक विरुद्ध युतीचे संजय मंडलिक यांची लढत झाली. महाडिक यांना त्यांच्या राष्ट्रवादीतूनच सुरुवातीपासूनच विरोध होता. त्यात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही त्यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली. भाजप-शिवसेनेची एकत्रित ताकद, मोदी यांची हवा आणि त्याला सतेज पाटील यांच्यासह दोन्ही काँग्रेसमधून मिळालेले बळ यांचा एकत्रित परिणाम म्हणून मंडलिक यांना हे मताधिक्य मिळाले.याउलट आणीबाणी लागू केल्याने देशभरात इंदिरा गांधी यांच्याविरोधात विरोधाची लाट आली होती. त्या लाटेत झालेली निवडणूक शेकापच्या देसाई यांनी सर्वांत कमी मतांनी जिंकली. त्यावेळी मतपत्रिका होत्या. माने यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती; परंतु ती नीट झाली नाही म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली; परंतु तोपर्यंत अडीच वर्षांत सरकारच कोसळल्याने तो विषय मागेच पडला.
एकूण सतरापैकी आठवेळा विजयी झालेल्या लढतीत उमेदवाराचे मताधिक्य सरासरी दीड लाख इतके राहिले आहे. पाच निवडणुकीत ५० हजारांच्या आत मताधिक्य राहिले आहे. उदयसिंहराव गायकवाड विरुद्ध शेकापचे गोविंदराव कलिकते, सदाशिवराव मंडलिक विरुद्ध शिवसेनेचे विक्रमसिंह घाटगे, राष्ट्रवादीचे सदाशिवराव मंडलिक विरुद्ध शिवसेनेचे धनंजय महाडिक, पुढे मंडलिक विरुद्ध संभाजीराजे, महाडिक विरुद्ध संजय मंडलिक या काही या मतदारसंघातील अत्यंत गाजलेल्या लढती होत.
शिवसेना आठ वेळा लढली, गुलाल एकदाचकोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना १९९१ पासून आतापर्यंत आठवेळा लढली; परंतु संजय मंडलिक यांच्या रूपाने शिवसेनेचा पहिला खासदार गेल्या निवडणुकीत कोल्हापूरने दिला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये तीनदा थेट लढत झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी दोन वेळा आणि शिवसेना एक वेळ विजयी झाली. रामभाऊ फाळके, रमेश देव, मेजर जनरल निवृत्त शिवाजीराव पाटील, विजय देवणे यांना सुमारे पावणेदोन लाख मते मिळाली. म्हणजे उमेदवार कोणीही असला तरी शिवसेनेचे या मतदारसंघात एवढे कमिटेड मतदान नक्की आहे.
१३ वेळा काँग्रेसच प्रमुख पक्षआतापर्यंत झालेल्या एकूण १७ लढतींपैकी तब्बल १३ वेळा लढतीतील प्रमुख पक्ष काँग्रेसच राहिला आहे. याचा अर्थ काँग्रेसच्याच विचारधारेचे जास्त काळ जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व राहिले. त्यानंतर शेका पक्षाचा दबदबा राहिला. काँग्रेस विरुद्ध शेकाप अशा तब्बल १० लढती झाल्या. त्यांतील आठ काँग्रेसने जिंकल्या.
पाटील एकदाच खासदारकोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत एकदाच पाटील आडनावाचे उमेदवार खासदार झाले आहेत. काँग्रेसचे व्ही. टी. पाटील १९६२ च्या निवडणुकीत शेकापच्या भाऊसाहेब महागांवकर यांचा पराभव करून विजयी झाले होते. या मतदारसंघात आताच्या निवडणुकीत ३ लाख ३३ हजार पाटील आडनावांचे मतदार आहेत.