सांख्यांसी प्रकृती आदिमाया अंबाबाई..
By admin | Published: September 28, 2014 12:55 AM2014-09-28T00:55:12+5:302014-09-28T00:56:32+5:30
- शारदीय नवरात्रौत्सव
कोल्हापूर : विश्वाची निर्मिती ज्या आदिशक्तीने केली, ती देवता म्हणजे अंबाबाई. शारदीय नवरात्रौैत्सवाच्या तिसऱ्या माळेला करवीर निवासिनी अंबाबाईची आदिमायेच्या रूपात पूजा बांधण्यात आली. एकनाथांचे नातू मुक्तेश्वर यांच्या शब्दांत ‘सांख्यांसी प्रकृती’ अशी ही जगदंबा आदिमायाशक्ती देवीचे वर्णन आहे. भवानी मंडपातील तुळजाभवानी देवीची वनविहार रूपात पूजा बांधण्यात आली. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत आज देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी जास्त होती. शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची आदिमाया रूपात पूजा बांधण्यात आली. विष्णूच्या चोवीस अवतारांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण अवतार म्हणजे श्री कपिलमुनी. स्वयंभू व मनूची कन्या देवहुती हिचा विवाह कर्दम ऋषींशी झाला. अनसूया आदी कन्यांच्या जन्मानंतर त्यांना कपिल नामक पुत्र झाला. समस्त विश्व प्रकृती पुरुष यांच्या आश्रयाने प्रकट झाले असून, त्यावर कालाची सत्ता चालते. हे सांख्य तत्त्वज्ञान शिकविणारे कपिल मुनी यांचे स्थान म्हणजे कपिलेश्वर. त्यांची माता देवहुती हिची ज्ञानलालसा जाणून त्यांनी स्वत:च्या मातेचे गुरूपद घेतले. हे जगावेगळे नाते केवळ याच करवीरात आकाराला आले. अशा या देवहुती मातेला सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचे मूर्त स्वरूप म्हणून आजही श्री अंबाबाईच्या मस्तकी नाग (काल), लिंग (पुरुष), योनी (प्रकृती) आपल्याला पाहायला मिळते. ही पूजा श्रीपूजक सागर मुनीश्वर, रवी माईनकर यांनी बांधली. पूजेची संकल्पना उमाकांत राणिंगा यांची असून, मूर्ती सर्जेराव निगवेकर व प्रशांत इंचनाळकर यांनी साकारल्या आहेत. आज दिवसभरात विठूमाउली भजनी मंडळ, साईप्रसाद भजनी मंडळ (पुणे), दत्तकृपा भजनी मंडळ (पुणे), स्त्रीशक्ती जागर, इंद्राणी ग्रुप (पुणे), भक्तिगीतांवर नृत्य - श्रावण सखी ग्रुप (डोंबिवली), श्री अंबाबाईचा जागर या संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. रात्री अंबाबाईची पालखी काढण्यात आली. भवानी मंडपातील तुळजाभवानी देवीची वनविहार रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा बाळासाहेब दादर्णे, महादेव बनकर, अमर झुगर, राजाराम शिंगे यांनी बांधली. आता सगळ््यांच्याच घरात घटस्थापनेचा विधी पूर्ण झाला आहे. आज शनिवार असल्याने अंबाबाईच्या दर्शनाला बाहेरील भाविकांची गर्दी जास्त होती. आडमार्गातून दर्शन... एकीकडे देवस्थान समितीने व्हीआयपी दर्शन बंदची घोषणा केली आहे. दुसरीकडे साक्षी विनायक गणपती येथील प्रवेशद्वारातून भाविकांना सोडले जात होते. या ठिकाणी पोलीस आणि काही स्वयंसेवक रांगांना शिस्त लावण्यासाठी उभे असतात. त्यांच्याकडूनच कित्येक भाविकांना आडव्या मार्गाने प्रवेश दिला जात होता, हा प्रकार म्हणजे दिव्याखाली अंधार, असाच म्हणावा लागेल.