सातारा : मुलीच्या मृत्यूचा विमा मिळवून देण्याच्या बहाण्याने वडिलांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 03:55 PM2018-03-28T15:55:41+5:302018-03-28T15:55:41+5:30
मुलीच्या आकस्मित मृत्यूबद्दल पोलीस अधिकाऱ्यांकडून विमा निधी मिळवून देण्याचे अमिष दाखवून वडिलांची ५८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : मुलीच्या आकस्मित मृत्यूबद्दल पोलीस अधिकाऱ्यांकडून विमा निधी मिळवून देण्याचे अमिष दाखवून वडिलांची ५८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, बाळू व्यंकट लोहार (वय ५१ रा. सासपडे, ता. सातारा) यांची मुलगी स्नेहल हिचा मृत्यू झाला. त्यांच्या गावातील पंकज मोहन यादव (वय २६) याने मुलीच्या मृत्यूची भरपाई म्हणून आकस्मित मयत विमा निधीतून बोरगाव पोलीस ठाण्याच्या साहेबांकडून २ लाख ३० हजार हजार रुपये मिळवून देतो, असे सांगून फेडरल बँकेत खाते काढण्यासाठी तीस हजार रुपये घेतले.
विमा निधीचा २ लाख ३० हजारांचा चेक बँक आॅफ महाराष्ट्र सातारा शाखेत जमा केला, असे सांगून काम करण्यासाठी पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर स्टॅम्प पेपर व मयत विमा प्रक्रियेसाठी १८ हजार रुपये घेतले.
मुलगा गणेश याला पाटण येथे आकस्मित मयत विमा निधीचा ५३ हजार रुपयांचा चेक भरल्याची खोटी बतावणी करून स्वत:ला पैशाची गरज असल्याची विनवणी केली. त्यानंतर पंकजच्या खात्यावर पाच हजार रुपये खात्यावर जमा केले.
अशाप्रकारे विश्वास संपादन करत वेळोवेळी ५८ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पंकज यादव याला अटक केली आहे. अधिक तपास बी. आर. यादव करीत आहेत.