कोल्हापूर : भाजपचे सर्वाधिक असलेले चिन्हावरील मतदार, प्रकाश आवाडे आणि विनय कोरे यांचा खंबीर पाठिंबा यामुळे कोणीही कितीही आकडे जाहीर केले तरी त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही, पण करून दाखवणार, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. २७० मतदार असल्याचा विरोधकांचा दावा निव्वळ हास्यास्पद असल्याची टीकाही त्यांनी केली.
आमदार पाटील यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या कोल्हापुरातील रूईकर कॉलनीतील निवासस्थानी विधान परिषदेच्या नियोजनासाठी शुक्रवारी सायंकाळी बैठक घेतली. या बैठकीनंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार आवाडे, आमदार विनय कोरे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर अध्यक्ष राहूल चिकोडे, प्रा.जयंत पाटील, जनसुराज्य युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष समित कदम, सुहास लटोरे, जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे, स्वरूप महाडिक उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, आज दिवसभरामध्ये इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले, पेठवडगाव, कुरूंदवाड असा दौरा केला. विविध गटांच्या मतदारांशी चांगला संपर्क झाला. २२ किंवा २३ तारखेला अमल महाडिक अर्ज दाखल करतील. आमच्या सर्व उमेदवारांची घोषणा दिल्लीतून होते; परंतु आम्ही इकडे काम सुरू केले आहे. आम्हीदेखील आमची सत्ता असताना पाच वर्षात सर्वांनाच मोठा निधी दिला आहे. ज्यांना याचा फायदा झाला आहे, ते लगेच विसरत नाहीत.
अनिल यादव यांचा गैरसमज दूर
यादव यांचे काही गैरसमज झाले होते. त्यामुळे त्यांची नाराजी होती. म्हणून ते सतेज पाटील यांच्या मेळाव्याला उपस्थित राहिले; मात्र आज त्यांची भेट घेतली आहे. त्यांचा गैरसमज दूर केला आहे.
स्थानिक पातळीवरील विरोधक एकत्र कसे
आमदार विनय कोरे म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यानंतर नगरपंचायतीच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. तेथे एकमेकांच्या विरोधात लढणारे गट या निवडणुकीत एकत्र येऊन कोणाला तरी मतदान करतील का, हा साधा प्रश्न आहे. त्यामुळे असे एकतर्फी मतदान कोठे होणार नाही.
रणनीती ठरली
सतेज पाटील यांनी गुरुवारी शक्तीप्रदर्शन केल्यानंतर चंद्रकांत पाटील हे दुसऱ्याच दिवशी जिल्ह्यात आले. काही सदस्यांच्या नाराजीबाबतही त्यांच्यापर्यंत काही बातम्या गेल्या. त्यामुळे त्यांनी शुक्रवारचा दिवस या जोडण्यांसाठी दिला. ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांचीही त्यांनी भेट घेतली. दिवसभर गाठी-भेटी घेतल्यानंतर पुन्हा आवाडे आणि कोरेंसह त्यांनी आढावा घेतला. आपली मते शाबूत ठेवून, काही वेगळा विचार करत असतील तर त्यांना थांबवून आणि नवी काही मते ताब्यात कशी घ्यायची, याबाबत या बैठकीत चर्चा झाली.