कोल्हापूर : कोल्हापुरातील पर्यावरण चळवळीचे आद्य प्रणेते, चित्रकार, वाचन व्यासंगी सतिश पोतदार (वय ५७) यांचे मेंदूतील रक्तस्त्रावाने कोल्हापूर येथे बुधवारी पहाटे निधन झाले.कोल्हापूरातील मरगाई गल्ली येथील रहिवाशी असलेले सतिश पोतदार यांनी स. म. लोहिया, शाहु विद्यालय येथे कलाशिक्षक म्हणुन नोकरी केली. त्यानंतर त्यांनी पुणे येथे कलाशिक्षक म्हणूनही बरेच वर्षे काम केले. रंकाळ्याच्या पहिल्या वहिल्या चळवळीचे ते आद्य प्रणेते होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पर्यावरणीय चळवळीची मोठी हानी झाली.गेली दोन वर्षे ते कॅनडा येथे चित्रकलेत वेगवेगळे प्रयोग करत राहिले. त्यांना कॅनडाचे नागरिकत्व मिळणार होते. तत्पूर्वी भारतात येउन जावे म्हणून ते अवघ्या दोन-तीन महिन्यापुर्वीच ते भारतात आले होते.दहा दिवसापूर्वीच ते कोल्हापुरात मरगाई गल्लीतील आपल्या घरी राहण्यास आले होते. सोमवारी चित्रे काढताना अचानक त्यांच्या मेंदूतील रक्तस्त्रावामुळे कोसळले. त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कॅनडात असणाऱ्या त्यांच्या पत्नीला ही माहिती मिळताच त्या कोल्हापूरात आल्या. बुधवारी पहाटे त्यांचा श्वास थांबला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन बहिणी, मेहुणे तसेच चित्रकलेतील प्रचंड असा शिष्य परिवार आहे.