कोल्हापूर : ‘राजीनामा द्या, राजीनामा द्या, विनोद तावडे राजीनामा द्या’, ‘शिक्षण वाचवा, विनोद तावडे, नंदकुमार यांना हटवा’, अशा घोषणा देत सर्वसामान्यांचे शिक्षण वाचविण्यासाठी शुक्रवारी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले.
रखरखत्या उन्हामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढून गोरगरीब, सर्वसामान्यांच्या शाळा बंद कराल तर, जशास तसे उत्तर देऊ असे आव्हान राज्य सरकारला दिले. महामोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, महापौर स्वाती यवलुजे यांनी केले.शासनाने राज्यातील शाळा बंद करून त्या कॉर्पोरेट कंपन्यांना चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. शासनाच्या या धोरणाची सुरुवात कोल्हापुरातील काही शाळा बंद करून झाली. शासनाच्या या धोरणाच्या विरोधात शिक्षण वाचवा नागरी कृती समितीने गेल्या दोन महिन्यांपासून जनआंदोलन सुरू केले आहे. यातील एक टप्पा म्हणून शुक्रवारी महामोर्चा काढण्यात आला.
जिल्ह्यातील शाळा बंद ठेवून विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालकांसह पालक या मोर्चात सहभागी झाले. दुपारी पावणे बाराच्या सुमारास गांधी मैदानातून महामोर्चाला सुरुवात झाली. रखरखत्या उन्हामध्ये शिक्षणमंत्री, शिक्षण विभागाचे सचिव, सरकारच्या विरोधात आणि मागण्यांबाबतच्या देत मोर्चा पुढे सरकत होता.खरी कॉर्नर, दैवज्ञ बोर्डिंग, मिरजकर तिकटी, देवल क्लब, बिंदू चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आला. याठिकाणी आंदोलनकर्त्यांनी पुन्हा जोरदार घोषणा दिल्या. यानंतर झालेल्या निषेध सभेत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
शिक्षण बचाव मोर्चासाठी सकाळी ९.३० वाजल्यापासून शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी गांधी मैदान येथे येण्यास सुरुवात केली. यात विद्यार्थ्यांच्या हाती शिक्षण वाचवा - देश वाचवा असे संदेश असलेले बोर्ड हाती होते. तर शिक्षकांनी ‘शिक्षणाचे कंपनीकरण’ थांबावा अशा पांढऱ्या टोप्या घातल्या होत्या. उन्हाची तमा न बाळगता मोर्चात सुमारे हजारो कोल्हापूूर सहभागी झाले होते. यात अग्रभागी शिक्षिका, विद्यार्थी, पालक, शिक्षक सहभागी झाले होते.
११.३० वाजण्याच्या सुमारास उन्हाचा तडाखा वाढत असतानाच मैदान निम्याहून अधिक भरुन गेले. मैदानात येणाºया प्रत्येक आंदोलकाच्या तोंडी शासनाच्या या निर्णयाचा निषेधाची वाक्ये होती. मैदानाच्या परिसरात आंदोलकांनी दुचाकी, चारचाकी पार्किंग केल्या होत्या . तर मैदानातून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाल्यानंतर या परिसरातील वाहतुकीची कोंडी झाली.
अनेक महिला शिक्षकांनी पारंपारिक नऊ वारी नेसून हातात शासनाचे निषेधाचे फलक धरले होते. तर एका रणरागिनीने तलवार उपसून शासनाचा निषेध करीत मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चाच्या अग्रभागी असलेल्या महिलांनी सरकारच्या विरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.