कोल्हापूर : कर्जाचे आमिष दाखवून महिला बचत गटांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या बिंदू चौक येथील लोककल्याण मल्टिस्टेट को-आॅप. सोसायटीच्या कार्यालयात संतप्त महिलांनी घुसून साहित्य बाहेर फेकले. त्यानंतर थेट राजारामपुरी पोलीस ठाण्यात येऊन सोसायटी व्यवस्थापनाविरोधात फिर्याद देऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हा प्रकार आज, बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडला. याबाबत पोलिसांनी सांगितले, बिंदू चौक येथे लोककल्याण मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅप. सोसायटीच्या व्यवस्थापनाने तीन महिन्यांपूर्वी शहरातील महिला बचत गटांना पन्नास ते एक लाखापर्यंतच्या कर्जाचे आमिष दाखवून प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे बचत खाते उघडून घेतले. अशा सुमारे शंभरपेक्षा जास्त महिलांनी सदस्य नोंदणी केली होती. गेल्या तीन महिन्यांपासून महिला कर्जाची विचारपूस करत होत्या. परंतु, सोसायटी व्यवस्थापन टाळाटाळ करत होते. आज दुपारी चारच्या सुमारास शिवाजी पेठ, फुलेवाडी, पीरवाडी येथील शंभरपेक्षा जास्त महिला सोसायटीच्या कार्यालयात आल्या. येथील व्यवस्थापन कर्मचाऱ्यांकडे त्यांनी कर्जाची मागणी केली. कर्ज द्या, अन्यथा घेतलेले पैसे परत द्या, अशी मागणी केली. कर्मचाऱ्यांनी पुन्हा उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त महिलांनी गोंधळ घालत कार्यालयातील टेबल, खुर्च्या, संगणक, आदी साहित्य बाहेर फेकले. महिलांचा उद्रेक पाहून कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून पळ काढला. या प्रकाराची शाहूपुरी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कार्यालयातील गोंधळ पाहून रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून महिलांना शांत केले. त्यानंतर हे कार्यालय राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येत असल्याने त्यांना तक्रार देण्यास सांगितले. पुन्हा काही निवडक महिला राजारामपुरी पोलीस ठाण्यात आल्या. याठिकाणी पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर अक्षरा अतुल चव्हाण (रा. शिवाजी पेठ) यांनी सोसायटीच्या व्यवस्थापनाविरोधात फिर्याद दिली. या प्रकरणी अधिक तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक आर. जे. नदाफ करत आहेत. (प्रतिनिधी)
कर्जाच्या आमिषाने बचत गटांची फसवणूक
By admin | Published: October 02, 2014 12:40 AM