‘सावित्रीबाई फुले’ला पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 12:01 PM2020-01-27T12:01:11+5:302020-01-27T12:07:03+5:30
कोल्हापूर शहरातील सर्व शासकीय रुग्णालये सक्षम करण्यासाठी प्राधान्य असणार आहे. यामध्ये महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाचाही समावेश आहे. या रुग्णालयाला गतवैभव प्राप्त करून देणार आहे. येथील पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली.
कोल्हापूर : शहरातील सर्व शासकीय रुग्णालये सक्षम करण्यासाठी प्राधान्य असणार आहे. यामध्ये महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाचाही समावेश आहे. या रुग्णालयाला गतवैभव प्राप्त करून देणार आहे. येथील पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली. रुग्णालयाला अचानक भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, त्यांनी थेट रुग्णांशीही सुविधेबाबत विचारपूस केली.
आमदार जाधव म्हणाले, सामान्य जनतेला आरोग्याचा खर्च पेलावत नाही. त्यांना शासकीय रुग्णालयेच आधारवड ठरतात. ही सर्व शासकीय रुग्णालये सक्षम करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी शहरातील सर्व रुग्णालयांना भेटी देत आहे. येथे कोणत्या सुविधा आहेत, कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, याची माहिती घेत आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या सावित्रीबाई रुग्णालयाला भेट दिली.
येथील रुग्णालयात अपुरा कर्मचारी वर्ग असतानाही काम समाधानकारक आहे. काही मशिनरींची आणि साहित्याची आवश्यकता आहे. याची माहिती घेतली असून प्राधान्यक्रमानुसार साहित्याची यादी करण्याच्या सूचना रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यामधील पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मशिनरी आणि स्वच्छतेला प्राधान्य असणार आहे. ही सर्व कामे सीएसआर फंड, आमदार फंडातून केली जाणार आहे.
यावेळी माजी नगरसेवक विनायक फाळके, दुर्गेश लिंग्रस, बंडा साळोखे, प्रा. पी. जी. मांगले, अवधूत भाट्ये, डॉ. प्रकाश पावरा, सुनील पाटील, दीपाली खाडे, अभिषेक साळोखे, दीपाली शिंदे, सुजित कुलकर्णी उपस्थित होते.
आणखी एक सोनोग्राफी मशीन देणार
वंदे मातरम् यूथ आॅर्गनायझेशनचे अवधूत भाट्ये यांनी येथील समस्यांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘सध्या एक सोनोग्राफी मशीन असून रुग्णांना तपासणीचा नंबर दुसऱ्या दिवशी येतोे.’ यावर आमदार जाधव यांनी ‘लवकरच आणखी एक सोनोग्राफी मशीन देऊ,’ अशी ग्वाही दिली.
स्टाफ भरतीसाठी लवकरच बैठक
सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये ७० टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याचा कामावर परिणाम होत असून तातडीने पदे भरणे आवश्यक असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले. यावर आमदार जाधव यांनी पुढील आठवड्यामध्ये महापालिकेत शहरातील विविध समस्यांसाठी बैठक घेणार असून, या बैठकीत यावरही चर्चा केली जाईल, असे सांगितले.
एक दिवस ‘सावित्रीबाई फुले’साठी
रुग्णालयामध्ये यापूर्वी सामाजिक बांधीलकी म्हणून नामवंत डॉक्टर सेवा बजावत होते. सध्या त्यांची संख्या कमी झाली आहे. यावर आमदार जाधव म्हणाले, मेडिकल असोसिएशनसोबत बैठक घेऊन एक दिवस सावित्रीबाई फुले रुग्णालयासाठी सेवा देण्याचे आवाहन डॉक्टरांना केले जाईल.
आठ दिवसांत अद्ययावत २४ बेड देणार
सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या भेटीवेळी आमदार जाधव यांनी तातडीने अद्ययावत असे १५० बेड देण्याचे जाहीर केले. यापैकी २४ बेड पुढील आठवड्यात दिले जातील, असेही त्यांनी ग्वाही दिली.
टप्प्याटप्प्याने करण्यात येणारी कामे
- नवीन इमारतीप्रमाणे जुन्या (प्रसूती विभाग) इमारतीचेही नूतनीकरण करणे.
- नवीन इमारतीमध्ये लिफ्टची सोय करणे.
- ऐपेजेएस्ट मशीन (बाळाच्या हृदयाचे ठोके तपासणी मशीन) आणणे.
- सीएसआर फंडातून लॅमिनिअर एअर मशीन आणणे.
- शवगृह उभारणे.
- रुग्णालयाला २४ तास पाणीपुरवठ्याची सोय करणे.
- आणखी सहा ईसीजी मशीन देणे.
- तक्रार निवारण कक्ष उभारणे.