रमेश पाटील
कसबा बावडा: राजाराम बंधाऱ्यात पोहण्यासाठी उडी मारलेल्या दोन शाळकरी मुलांपैकी एक जण बुडाला तर एकाला वाचवण्यात यश आले. मिहीर इम्रान पठाण (वय १०, रा.लाईन बझार, कोल्हापूर) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. तर नाव मानव गणेश कांबळे (१२, रा. आंबेडकर नगर, कसबा बावडा) याल वाचवण्यात यश आले. आज, बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी बावडा आणि लाईन बाजार येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, माहीर व मानव यांच्यासह काही शाळकरी मुले दुपारी एकच्या सुमारास पंचगंगा नदीपात्रात पोहण्यासाठी आली. माहीर व मानव या दोन मित्रांनी राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात उडी घेतली. इतर मुले काठावरच उभी होती .या दोघांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडू लागल्यानंतर दोघांनीही आरडाओरड सुरु केली. मुलांचा आरडाओरडा ऐकून मासे पकडत असणाऱ्या तरुणाने नदीपात्रात उडी घेतली व मानव कांबळे याला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला तात्काळ सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.
मिहीर पठाण मात्र वाहत जाऊन बुडाला. त्याचा बावडा रेस्क्यू फोर्स तसेच कसबा बावडा व कावळा नाका येथील अग्निशमन दलाच्या जवानानी शोध घेतला. एक तासाच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह हाती लागला. अग्निशमन जवानाच्या मदतीने माहीर याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. माहीर याच्या पश्चात भाऊ आणि आई आहे.