कोल्हापूर : राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक अशा सर्वच शाळांना घरगुती दराने घरफाळा, वीज बिल, पाणी बिल आकारावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने सोमवारी केली. त्याबाबतचे निवेदन राज्य शासनाला देण्यात आले असल्याची माहिती शिक्षक सेनेचे जिल्हा नेते संतोष आयरे यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांना व्यावसायिक दराने घरफाळा, वीज बिल, पाणी बिल आकारले जात असल्याने या शिक्षणसंस्था आणि शाळेतील शिक्षकांना याचा नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शाळा इमारतींना घरगुती दराने घरफाळा, वीज बिल, पाणी बिल आकारावे, अशी मागणी सर्व शाळांची आहे. त्यासह एकूण शासन स्तरावर प्रलंबित असणाऱ्या ३७ मागण्यांचे निवेदन सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांना देण्यात आले. यावेळी कृष्णात धनवडे, टी. आर. पाटील, स्नेहल रेळेकर, गिरिजा जोशी, नयना पाटील, सुनीता हंकारे, विलास बोरचाटे आदी उपस्थित होते.
शाळांना घरगुती दराने घरफाळा, वीज बिल आकारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 4:27 AM