कोल्हापूर : अकरा वर्षांतील कारभार, एकखांबी नेतृत्व, उमेदवारी निवडीत दाखवलेली मुत्सद्दीगिरी, आक्रमक प्रचार यंत्रणेमुळे ‘कोजिमाशि’ पतसंस्थेत दादासाहेब लाड यांनी परंपरा मोडीत काढण्याची किमया केली. एकत्रित बांधलेल्या मोटेमुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला गाफिलपणा, नेत्यांमधील एकवाक्यतेच्या अभावाचा फटका महाआघाडीला बसला. पतसंस्थेवर स्थापनेपासून शिक्षक संघटनांचे प्राबल्य राहिले. मर्यादित ताकद असतानाही दादासाहेब लाड यांनी सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांना नामोहरण करण्याची एकही संधी सोडली नव्हती. कारभारासह नोकरभरतीवर त्यांनी सत्ताधाऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले होते. त्याचा परिणाम २००३ च्या निवडणुकीत दिसला. पतसंस्थेची सत्ता हातात घेतली. २००३ ते २००८ या काळात लाड यांनी नवीन व जुन्या चेहऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी पतसंस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. मागील दोन निवडणुकीपेक्षा ही निवडणूक वेगळी होती. दादांचे सहकारी राजेंद्र रानमाळे, प्रा. जयंत आसगांवकर, बाबा पाटील हे बाजूला गेले होते. एवढेच नव्हे , तर काही करून दादांना ‘कोजिमाशि’तून बाजूला करायचेच यासाठी रानमाळे यांनी गेले पाच वर्षे प्रयत्न सुरू केले होते. शिक्षक संघटना, कृती समिती यांच्याबरोबर मोट बांधून एक तगडे पॅनेल देण्याचा प्रयत्न झाला. राम पाटील, बी. डी. पाटील, एम. एम. गळदगे, गणपतराव बागडी, बाबा पाटील, प्रा. आसगांवकर, राजेंद्र रानमाळे अशा अर्धा डझन नेत्यांमुळे महाआघाडी सक्षम दिसत होती. आपल्या विरोधात हे सर्व नेते एकत्रित येणार हे लाड यांना माहिती असल्याने त्यांनी तशी बांधणी केली होती. पॅनेलची बांधणी करताना कोणत्या तालुक्याला झुकते माप द्यायचे, उमेदवारी न मिळालेल्या तालुक्यांचे समाधान कसे करायचे? याचे आडाखे दादांनी अगोदरच बांधली होते. या उलट महाआघाडीचे पॅनेल बांधताना उमेदवारी निवडताना विजयापेक्षा आपल्या गटाच्या पदरात उमेदवारी कशी पडेल, एवढेच पाहिले. त्यामुळे गरज नसताना एकाच तालुक्यात चार-चार उमेदवारी देण्यात आल्या. त्याचा फटका महाआघाडीला बसला. त्याचबरोबर महाआघाडीच्या नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारची एकवाक्यता दिसली नाही. प्रचार यंत्रणा प्रत्येकाने आपल्या पद्धतीने राबविली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एवढे नेते एकत्र आल्याने विजयाबद्दल आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला होता. केवळ निकालाची औपचारिकता राहिल्याचे कार्यकर्ते सांगत होते, त्या-त्या तालुक्यातील उमेदवारही शाळांमध्ये पोहोचू शकले नाहीत आणि हेच घातक ठरले. एकंदरीत दादा लाड यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले हे मात्र निश्चित. कागदावरच्या गणितात महाआघाडी फसलीगेली दोन-तीन वर्षे दादांना पतसंस्थेतून बाजूला करण्यासाठी विरोधकांनी तयारी सुरू केली होती. एक एक गट आपल्या बरोबर घेत त्यांच्या ताकदीची कागदावर गणिते मांडत गेले. अर्धा डझन नेत्यांच्या ताकदीचे गणित गृहीत धरूनच महाआघाडीने प्रचार यंत्रणा राबविली आणि येथेच ते फसले.
‘दादां’च्या नेतृत्वावर शिक्का
By admin | Published: April 22, 2015 12:07 AM