‘लोकमत’च्या दिवाळी अंकांतून नव्या वाचकांचा शोध : देवानंद शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:54 AM2018-11-06T00:54:40+5:302018-11-06T00:55:35+5:30

कोल्हापूर : ‘दीपोत्सव’ आणि ‘उत्सव’ या ‘लोकमत’च्या दिवाळी अंकांमधून नवे वाचक तयार होत असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ...

Search of new readers from 'Diwali' Diwali: Devanand Shinde | ‘लोकमत’च्या दिवाळी अंकांतून नव्या वाचकांचा शोध : देवानंद शिंदे

कोल्हापुरात सोमवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात ‘उत्सव’ दिवाळी अंकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून ‘लोकमत’चे उपमहाव्यवस्थापक (वितरण-साऊथ महाराष्ट्र) संजय पाटील, गोपाळकृष्ण गोखले कॉलेजच्या प्रशासनाधिकारी मंजिरी मोरे-देसाई, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, मुख्य बातमीदार विश्वास पाटील, लेखिका सोनाली नवांगुळ उपस्थित होत्या.

Next
ठळक मुद्दे‘उत्सव’चे उत्साहात प्रकाशन; वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न : सोनाली नवांगुळ

कोल्हापूर : ‘दीपोत्सव’ आणि ‘उत्सव’ या ‘लोकमत’च्या दिवाळी अंकांमधून नवे वाचक तयार होत असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी येथे केले.

‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीच्या ‘उत्सव’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. ‘लोकमत’च्या शहर कार्यालयातील या कार्यक्रमास गोपाळकृष्ण गोखले कॉलेजच्या प्रशासनाधिकारी डॉ. मंजिरी मोरे-देसाई, लेखिका डॉ. सोनाली नवांगुळ प्रमुख उपस्थित होत्या.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘लोकमत’समवेत माझे एक वेगळे नाते आहे; त्यामुळे या दिवाळी अंकांचे प्रकाशन माझ्या हस्ते झाल्याने वेगळा सन्मान मला लाभला. प्रत्येकात एक वाचक असतो. ‘दीपोत्सव’ आणि ‘उत्सव’ या अंकांनी असे वाचक शोधण्याचे काम केले आहे. ग्रामीण भागात विज्ञानवादी विचार, संकल्पना आणि नवतंत्रज्ञानाचा उदय होत आहे. त्याला ‘लोकमत’ने प्रोत्साहन द्यावे.

लेखिका नवांगुळ म्हणाल्या, ‘लोकमत’चे दिवाळी अंक म्हणजे समाज परिवर्तन कसे होत आहे, ते पाहण्याचा टीपकागद आहे. जितका खर्च झाला, त्यापेक्षा अधिक रिझल्ट मिळालाच पाहिजे, अशी वृत्ती वाढत असताना वाचनसंस्कृती वाढविण्याचा एक वेगळा विचार घेऊन ‘लोकमत’ वाटचाल करत आहे.डॉ. मंजिरी मोरे-देसाई म्हणाल्या, ‘वाचनसंस्कृतीला बळ देण्याचे काम या दिवाळी अंकांमधून होत आहे. ‘दीपोत्सव’ हा दिवाळी अंक नव्हे, तर पीएच.डी. संशोधनाचा शोधनिबंध आहे. आज बोटावर मोजण्याइतके प्राध्यापक लेखन करतात. कॉलेजमधील बहुतांश विद्यार्थी वाचनापासून दूर गेले आहेत. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत.

‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, राज्यपातळीवर ‘दीपोत्सव’ आणि स्थानिक पातळीवर ‘उत्सव’ हा दिवाळी अंक ‘लोकमत’ प्रकाशित करते. संपादन ते मांडणीपर्यंत सतत नवे प्रयोग करणारा, मराठी वाचकांसाठी दरवर्षी एका नव्या अनुभवाचे दार उघडणारा असा ‘दीपोत्सव’ हा अंक आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमधील स्थानिक लेखकांना ‘उत्सव’ या अंकामध्ये संधी दिली जाते. या अंकांच्या माध्यमातून लेखक आणि ‘लोकमत’ यांच्यात भावबंध निर्माण झाले आहेत.’
या कार्यक्रमास ‘लोकमत’चे उपमहाव्यवस्थापक (वितरण-साऊथ महाराष्ट्र) संजय पाटील, मुख्य बातमीदार विश्वास पाटील, उपव्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष साखरे, जाहिरात व्यवस्थापक विवेक चौगुले, वितरण व्यवस्थापक ओंकार कोठावळे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर उपस्थित होते.

लेखकांचा सन्मान
लेखकांना कष्ट करायला लावून त्यांचे विचार दिवाळी अंकांतून समाजापर्यंत ‘लोकमत’ पोहोचवीत आहे. केवळ लेखनावर अवलंबून असणाऱ्यांना ‘लोकमत’ हे सन्मान आणि बळ देते, असे लेखिका नवांगुळ यांनी सांगितले.


 

Web Title: Search of new readers from 'Diwali' Diwali: Devanand Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.