कोल्हापूर : वाळवंटी राजस्थानपेक्षा विकास दरात महाराष्ट्र मागे असून, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री सिंचन’ योजना आणली आहे. या योजनेमुळे राज्यात दुसरी हरितक्रांती होईल, असा विश्वास व्यक्त करीत या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण कोल्हापूर जिल्हा ठिबकयुक्त करण्यासाठी आराखडा तयार केला असून, त्याचा पाठपुरावा केंद्राच्या पातळीवर करणार असल्याचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी सांगितले. गेले चार दिवस मेरी वेदर ग्राऊंड येथे सुरू असलेल्या ‘भिमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडिक होते. भिमा प्रदर्शनाचे कौतुक करत आगामी काळात या प्रदर्शनाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करीत आमदार हाळवणकर म्हणाले, शेतकऱ्यांनी वेशीबाहेर जाऊन नवतंत्रज्ञान आत्मसात केले तरच उद्याच्या स्पर्धेत तो टिकू शकतो. प्रदर्शनाला गेले चार दिवसांत आठ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी भेट दिल्याचे सांगत संयोजक खासदार धनंजय महाडिक म्हणाले, दहा वर्षांत अधिक अधिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आगामी काळातही परदेशातील तंत्रज्ञान या छताखाली आणण्याचा मानस आहे. ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर यांनी स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, उद्योगपती चंद्रकांत जाधव, भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई, भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक, योगेश कुलकर्णी, सत्यजित भोसले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) बंडगर यांचा खिल्लार ‘चॅम्पियन’प्रदर्शनात विविध गटांतून क्रमांक काढण्यात आले; पण संपूर्ण प्रदर्शनाचा ‘चॅम्पियन आॅफ द शो’ म्हणून तुकाराम बंडगर (सांगोला) यांच्या खिल्लारला गौरविण्यात आले. बचत गटांचाही गौरव!चार दिवसांत ६० हजारांपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या महिला बचत गटांचा गौरव आमदार हाळवणकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर ‘उत्कृष्ट कृषी संशोधक’ म्हणून प्रा. सर्जेराव पाटील (कदमवाडी), डॉ. जितेंद्रकुमार कदम (कसबे डिग्रज), डॉ. विजय तरडे ( कोल्हापूर), रमेश जाधव (येलूर). ‘शेतीभूषण’ म्हणून दादासो पाटील (सरूड), सुहास घाटगे (पारगांव), बळवंत शिंदे (माले मुडशिंगी), रघुनाथ बचाटे (बहिरेश्वर), रामचंद्र जाधव (नागाव), भरत आंबी (नांदणी) यांना सन्मानित करण्यात आले.
‘प्रधानमंत्री सिंचन’मुळे दुसरी हरितक्रांती
By admin | Published: January 31, 2017 12:52 AM