कोल्हापूर : हांगझोऊ , चीन मध्ये उद्या, मंगळवारपासून सुरु होणाऱ्या एशियन पॅरा स्पर्धेसाठी कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू स्वप्नील संजय पाटील याची भारतीय संघात निवड झाली.चीन मध्ये रंगणाऱ्या बहुप्रतिक्षित चौथ्या एशियन पॅरा स्पर्धेसाठी क्रिडा मंत्रालयाने व भारतीय पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया यांच्यावतीने १९१ पुरुष आणि ११२ महिला असे ३०२ भारतीय पॅरा खेळाडूंचे जंबो पथक पाठवले आहे. भारतीय पॅराओलंपिक क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठा भारतीय खेळाडूचा संघ विविध क्रीडा प्रकारात सहभागी होत आहे . या एशियन पॅरा गेम्स क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू २३ स्पर्धामध्ये आव्हान देतील. या स्पर्धा २३ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हांगझोऊ येथे होणार आहेत. जलतरण या क्रीडा प्रकार पुरुष व महिला १४ जलतरणपटू भारतीय संघाचे प्रतिनिधी करणार आहेत या भारतीय संघात कोल्हापुरचा आंतरराष्ट्रीय पॅरा जलतरणपटू स्वप्निल संजय पाटील याची भारतीय संघात निवड झाली आहे. तो या स्पर्धेमध्ये ५० मी फ्रि स्टाईल, १००मी फ्रि स्टाईल, १०० मी बॅक स्ट्रोक, १००मी बटरफ्लाय या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे. तो त्तिसऱ्यांदा स्पर्धेत सहभागी होत आहे. पॅरा एशियन २०१४- १ कांस्यपदक, २०१८- १ रौप्य पदक, २ कांस्यपदक सह त्याने पॅरा एशियन स्पर्धेमधील दोन रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंदवले गेले आहेत. त्याच्या कामगिरीची दाखल घेत शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर २०२२ साली भारत सरकारने अर्जुन अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित केले आहे.सध्या स्वप्निल बेंगलोर येथे शरद गायकवाड यांचा मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक सराव करीत आहे. तो पॅरालिंपिक स्पोर्ट्स असोसिएशन (महाराष्ट्र) यांच्यासह कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पॅरालिम्पिक असोसिएशनचा खेळाडू आहे. स्वप्निला मुंबईचे राजाराम घाग यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
एशियन पॅरा स्पर्धेसाठी कोल्हापूरचा जलतरणपटू स्वप्निल पाटील याची निवड
By सचिन भोसले | Published: October 23, 2023 2:36 PM