राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अण्णा ठाकूर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 08:49 PM2017-12-02T20:49:30+5:302017-12-02T20:52:51+5:30
कोल्हापूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीराम गणेश ठाकूर (वय ९७) यांचे शनिवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. अण्णा म्हणून ते परिचित होते. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे ते श्वसूर होत. शनिवारी सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन सोमवर दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.
कोल्हापूर : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीराम गणेश ठाकूर (वय ९७) यांचे शनिवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. अण्णा म्हणून ते परिचित होते. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे ते श्वसूर होत. शनिवारी सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन सोमवर दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड गावी अण्णा ठाकूर यांचा १९२१ मध्ये जन्म झाला. शिक्षणासाठी ते कोल्हापूरात आले. १९३३ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. शिक्षणानंतर चार वर्षे त्यांनी संघ प्रचारक म्हणून काम केले. कोल्हापूरात स्थायिक झाल्यानंतर बिनखांबी गणेश मंदिर येथे त्यांनी ठाकूर अॅन्ड कंपनी हे किरणामालाचे दुकान सुरु केले.
संघाचे तत्कालीन संघचालक चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर आणि अॅड. बाबासाहेब खासबारदार यांच्यासोबत त्यांनी काम केले. १९४८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आलेल्या बंदीच्या काळात ते सांगली येथील कारागृहात होते. त्यानंतर १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या काळात त्यांनी दोन वर्षे तुरुंगवास भोगला. त्यांच्या पत्नी कृष्णाताई ठाकूर आणि मुले असा संपूर्ण परिवारच त्यावेळी तुरुंगात होता. अण्णा ठाकूर यांनी २२ वर्षे संघाचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह म्हणून काम पाहिले.
कोल्हापूर जिल्ह्यात संघ आणि परिवारातील संघटनांचा विस्तार करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांना कोल्हापूर भूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
अण्णा ठाकूर यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे, परतंवडे असा मोठा परिवार आहे. गेल्या आठवड्यापासून ते आजारी होते. शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्यसंस्कारप्रसंगी बालगोपाल तालमीचे अध्यक्ष श्रीनिवास साळोखे, माजी आमदार सुरेश साळोखे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य, सुभाष वोरा, संघचालक भगतराम छाबडा, विशेष सरकारी वकील विवेक शुक्ल यांच्यासह विविध क्षेतापील मान्यवर उपस्थित होते.