कोल्हापूर : रंकाळ्यावर पाठलाग करून सशस्त्र हल्ला करून अजय ऊर्फ रावण दगडू शिंदे (वय २५, रा. डवरी वसाहत, यादवनगर) या सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सात संशयितांना शुक्रवारी अटक केली. यामध्ये एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले. संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.पथकाने संशयितांना इस्पुर्ली आणि सायबर चौक येथून ताब्यात घेतले. दोन गटांतील वर्चस्व वादातून अजय शिंदे याचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली. पोलिसांनी अटक केलेल्यांत राज संजय जगताप (वय२१), सचिन दिलीप माळी (वय १८), रोहित अर्जुन शिंदे (वय २०), नीलेश उत्तम माळी (वय २१), नीलेश बाबर (सर्व रा. डवरी वसाहत), आकाश आनंदा माळी (वय २१, मूळ रा. नांदणी नाका, जयसिंगपूर सध्या रा. बालिंगा ता. करवीर), प्रशांत संभाजी शिंदे (रा. कसबा बीड, ता. करवीर) यांचा समावेश आहे. एका अल्पवयीन मुलाचाही यामध्ये सहभाग आहे.तीन दिवसांपूर्वी झालेला वाद मिटवण्यासाठी रंकाळा चौपाटीवर बोलावून घेऊन सहा ते सात जणांनी कोयते आणि एडक्याने २० ते २५ वार करून शिंदे याचा खून करुन संशयित पळून गेले होते. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली होती. याप्रकरणी स्वतंत्र पथके तैनात करुन जुना राजवाडा पोलिस आणि एलसीबीने संशयितांचा शोध घेण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले होते. त्यानुसार पथकाने आरोपींचा शोध घेतला. इस्पुर्ली येथील एका घरात संशयित लपल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्यांचा शोध घेऊन ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकातील पोलिस अंमलदार अमर आडूळकर, प्रवीण पाटील यांनी माहिती घेऊन ७ संशयितांना इस्पुर्ली (ता. करवीर) तर नीलेश बाबर याला सायबर चौकातून ताब्यात घेतले.