सातव्या माळेला करवीरनिवासिनीअंबाबाई भुवनेश्वरी रूपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 04:00 PM2017-09-27T16:00:44+5:302017-09-27T16:20:36+5:30
शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला (बुधवारी) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची भुवनेश्वरी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली.
कोल्हापूर, 27 : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला (बुधवारी) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची भुवनेश्वरी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली.
देवीच्या दशमहाविद्यांमधील ही चौथ्या क्रमांकाची देवता असून ती श्रीकुलामधील एक प्रधानदेवी आहे. त्रिपुरसुंदरीचे स्वरूपासारखेच या देवीचे रूप असून फक्त हातात पुष्पबाण व ईक्षुदंड नाही. भुवनेशी ही पाशांकुशवरदाभयहस्तका म्हणजेच तिच्या हातांमध्ये पाश, अंकुश आहे तसेच तिने वरद आणि अभयमुद्रा धारण केल्या आहेत. मंत्रावरून या देवीला ‘एकाक्षरी विद्या’ असेही म्हटले जाते.
देवीचा वर्ण उगवत्या सुर्याप्रमाणे तांबडा असून त्रिपूरसुंदरीने निर्माण केलेल्या विश्वाचे ती संचलन करते. या देवतेच्या नावे ‘भुवनेश्वरी संहिता’ नावाचा ग्रंथ असून त्यात दुर्गासप्तशतीची महती सांगितली आहे. ही पूजा श्रीपूजक माधव मुनीश्वर व मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.