इचलकरंजी : मंगळवारी (दि.१३) सायंकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक गटारी तुंबलेल्या आहेत. गटारी भरून वाहत असल्याने चौकात पाणी साचले होते. त्यामुळे गटारीतील मैला, कचरा रस्त्यावर सर्वत्र पसरलेला होता. शहरातील अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात गेल्या चार दिवसांपासून वळीवाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे मुख्य रस्ते व चौकातील गटारीत पाणी साचले आहे. जुना सांगली नाका चौकातही गटारी तुंबून पाणी साचून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गटारीही भरलेल्या आहेत. या भागात जवळच मोठे मच्छी मार्केट आहे. अनेक दिवसांपासून येथील गटारी तुंबून मैला व कचरा साचून राहिल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. हा रस्ता पुढे सांगली जिल्ह्यास जोडणारा मुख्य मार्ग असल्याने नेहमी वर्दळ असते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढत जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. पावसामुळे अनेक भागात रस्त्याकडेला चिखल साचलेला असून आरोग्याची समस्या उद्भवत आहे. भागातील नागरिकांनी नगरपालिकेकडे तक्रार करूनही यावर तोडगा निघाला नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
चौकट
कोट्यवधींचा खर्च पाण्यात
नगरपालिकेने सारण गटारीची स्वच्छता करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा ठेका दिला आहे. स्वच्छतेवर इतका खर्च करूनही नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा ठेका देऊनही व्यवस्थित स्वच्छता होत नसेल, तर सर्व खर्च पाण्यात जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.
फोटो ओळी
१४०४२०२१-आयसीएच-०३
इचलकरंजीतील सांगली रोडवर गटारी तुंबून मुख्य मार्गावर दुर्गंधीयुक्त सांडपाणी पसरले आहे. त्यातूनच वाहनधारक मार्गक्रमण करीत आहेत.