‘शेकाप’चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, जाब विचारु : संपतराव पवार-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 04:45 PM2017-12-05T16:45:24+5:302017-12-05T16:52:47+5:30
कर्जमाफीवरुन धुळफेक करुन शेतकऱ्यांना फसवणारे हे सरकार नादान आहे. येणाऱ्या काळात त्यांना जाब विचारु असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी मंगळवारी येथे दिला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करुन सातबारा कोरा करा, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या मारण्यात आला.
कोल्हापूर : कर्जमाफीवरुन धुळफेक करुन शेतकऱ्यांना फसवणारे हे सरकार नादान आहे. येणाऱ्या काळात त्यांना जाब विचारु असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी मंगळवारी येथे दिला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करुन सातबारा कोरा करा, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या मारण्यात आला.
दुपारी एकच्या सुमारास टेंबे रोडवरील ‘शेकाप’ कार्यालय येथून मोर्चाला सुरुवात झाली. ‘कष्टाचा राजा शेतकरी...त्याला करु नका भिकारी’, ‘नको आम्हाला डिजिटलयाझेशन...आम्हाला हवा शेतकरीलायझेशन’, ‘आम्ही लाभार्थी...गॅस-वीज दरवाढीचे आणि लोड शेडींगचे’ अशा आशयाचे फलक लक्ष वेधत होते. घोषणाबाजी करत हा मोर्चा बिंदू चौक, शिवाजी चौक, महापालिका, आईसाहेब महाराज पुतळा, लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी जोरदार निदर्शने करत आंदोलकांनी ठिय्या मारला.
यावेळी संपतराव पवार-पाटील म्हणाले, कर्जमाफीबाबत सरकारने घोषणाबाजी करून गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या फसव्या कर्जमाफीचा काही लाभ होत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे.
याचबरोबर शेतमालाच्या खरेदीसाठी शासनाने उभारलेली तुटपुंजी खरेदी केंद्रे ही व्यापाऱ्यांची बटीक असल्याचे दिसत आहेत. शेतीपंप वीजधारकांच्या वीजदरात सातत्याने सरकार वाढ करीत आहे. शेतकरी कुटुंबातील पती-पत्नी यांना ६० वर्षानंतर महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन मिळावी, ही मागणीही धूळ खात पडली आहे.
आंदोलनात अशोकराव पवार-पाटील, भारत पाटील, केरबा पाटील, बाबासाहेब देवकर, दत्तात्रय पाटील, जनार्दन जाधव, बाबूराव कदम, अमित कांबळे, शिवाजी साळुंखे, अंबाजी पाटील, वसंत कांबळे, सुभाष झेंडे, चंद्रकांत बागडी, अजित देसाई, एकनाथ पाटील, राजू देशमाने, शाहीर रंगराव पाटील, मधुकर हरेल, संतराम पाटील आदींचा सहभाग होता.