कोल्हापूर : कर्जमाफीवरुन धुळफेक करुन शेतकऱ्यांना फसवणारे हे सरकार नादान आहे. येणाऱ्या काळात त्यांना जाब विचारु असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी मंगळवारी येथे दिला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करुन सातबारा कोरा करा, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या मारण्यात आला.
याचबरोबर शेतमालाच्या खरेदीसाठी शासनाने उभारलेली तुटपुंजी खरेदी केंद्रे ही व्यापाऱ्यांची बटीक असल्याचे दिसत आहेत. शेतीपंप वीजधारकांच्या वीजदरात सातत्याने सरकार वाढ करीत आहे. शेतकरी कुटुंबातील पती-पत्नी यांना ६० वर्षानंतर महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन मिळावी, ही मागणीही धूळ खात पडली आहे.आंदोलनात अशोकराव पवार-पाटील, भारत पाटील, केरबा पाटील, बाबासाहेब देवकर, दत्तात्रय पाटील, जनार्दन जाधव, बाबूराव कदम, अमित कांबळे, शिवाजी साळुंखे, अंबाजी पाटील, वसंत कांबळे, सुभाष झेंडे, चंद्रकांत बागडी, अजित देसाई, एकनाथ पाटील, राजू देशमाने, शाहीर रंगराव पाटील, मधुकर हरेल, संतराम पाटील आदींचा सहभाग होता.