Shahu Chhatrapati 75th birthday: राजर्षींचा वारसा शाहूंनी उत्तमप्रकारे सांभाळला, शरद पवारांचे गौरवोद्गार
By विश्वास पाटील | Published: January 7, 2023 07:44 PM2023-01-07T19:44:16+5:302023-01-07T19:48:25+5:30
शाहू छत्रपती राजवाड्यात राहिले नाहीत तर सामान्यांचे दुःख पेलण्यासाठी पुढे आले
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची समतेची विचारधारा सातत्याने जपण्याचे कार्य शाहू छत्रपतींनी केले, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सायंकाळी खासबाग कुस्ती मैदानात बोलताना काढले. अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने पवार यांच्या हस्ते शाहू छत्रपती यांचा चांदीची गदा, फेटा, शाल देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी पवार बोलत होते.
पवार म्हणाले, देशात अनेक राजे होऊन गेले, त्यांची राज्ये ही त्यांच्या नावाने ओळखली गेली. पण एक राज्य असे होते ते भोसल्यांचे नव्हते तर रयतेच होते. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे राज्य केले म्हणूनच त्यांच्याबद्दल आपणाला अभिमान आहे. राजर्षी शाहू महाराजांनी रयतेचे राज्य केले. तोच आदर्श, तोच वारसा शाहू छत्रपती जपण्याचे काम करत आहेत.
शाहू छत्रपतीनी घराण्याची परंपरा जपताना कधी भूकंप असेल, कधी महापूर असेल, कोरोनाची महामारी असेल शाहू छत्रपती राजवाड्यात राहिले नाहीत तर सामान्यांचे दुःख पेलण्यासाठी पुढे आले, असे सांगून पवार म्हणाले की, शाहू छत्रपतींनी अनेक क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत. शैक्षणिक संस्था तर अतिशय उत्तमरित्या चालविल्या आहेत. त्यांचे मार्गदर्शन केवळ करवीर नगरीलाच नाही तर महाराष्टाला व्हावे अशी अपेक्षा आहे.