भ्रामक वृत्ती थोपविण्यासाठी शाहूंचे विचार गरजेचे

By admin | Published: June 27, 2016 01:01 AM2016-06-27T01:01:34+5:302016-06-27T01:16:06+5:30

शरद पवार यांचे मत : राजर्षी शाहू ग्रंथाचा हिंदीत अनुवाद प्रकाशित; शाहूंनी उपेक्षित माणूस केंद्रबिंदू मानला : एन. डी. पाटील

Shahu's thoughts are needed to stop the deceptive attitude | भ्रामक वृत्ती थोपविण्यासाठी शाहूंचे विचार गरजेचे

भ्रामक वृत्ती थोपविण्यासाठी शाहूंचे विचार गरजेचे

Next

कोल्हापूर : समाजात भ्रामक कल्पना पसरविणारा वर्ग पुन्हा जोमाने वाढत आहे. ते समाजात चुकीचा पगडा पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा या कामकाजाबद्दल राजर्षी शाहू महाराजांना घृणा, संताप होता. अशा प्रवृत्तीला वेळीच दूर करण्यासाठी शाहूंच्या विचारांची नितांत गरज असल्याचे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या वतीने डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘राजर्षी शाहू छत्रपती : एक समाजक्रांतिकारी राजा’ या प्रा. डॉ. पद्मा कदम यांनी हिंदी अनुवादित केलेल्या शाहू चरित्रग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते रविवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते.
पवार म्हणाले, समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी सत्तेचा वापर दलितांचे विचार बदलण्यासाठी केला. माझ्याकडे सत्ता असताना देशात महिलांना ५० टक्के आरक्षणाबाबतचा निर्णय घेतला. ही प्रेरणा मला शाहूराजांच्या स्मृतीतून मिळाली. शाहूंनी स्वातंत्र्यपूर्व काळात दलितांसाठी आरक्षणाचा निर्णय घेतला. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी प्राथमिक शिक्षणाला त्यांनी पाठबळ दिले. डॉ. आंबेडकर यांना शाहूंच्या कार्यातूनच खरी प्रेरणा मिळाल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले.
डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, दबलेल्या, पिचलेल्या वर्गाबाबत शाहूंनी राखीव जागांचा वटहुकूम काढला. त्या वटहुकुमामुळे आजही राज्यकर्ते चाचपडत आहेत. त्यांनी सामान्य, दुर्लक्षित, उपेक्षित माणूस केंद्रबिंदू मानून समाजकार्याचा मार्ग अवलंबला.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, डॉ. जयसिंगराव पवार यांनी शाहू ग्रंथाच्या माध्यमातून विचार मांडण्याचे केलेले कार्य कौतुकास्पद आहे. समाजात जोपर्यंत समता निर्माण होत नाही तोपर्यंत शाहूंचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहोचले, असे म्हणता येणार नाही.
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात जो शाहूंचा प्रकल्प डोळ्यांसमोर ठेवला, त्याचा एक टप्पा आज पूर्ण केला. पंधरा वर्षांपूर्वी पॅलेसच्या प्रांगणात शाहूंचा पहिला ग्रंथ प्रकाशित करताना शरद पवार यांनी हा ग्रंथ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी प्रयत्न करावेत, असा ठेवलेला संकल्प आज पूर्ण करीत आहोत. पवारांनी आता अराजकीय आत्मचरित्र लिहावे, अशी आपली इच्छाही असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. मंजूश्री पवार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. प्रा. पद्मा पाटील, आदींनीही विचार मांडले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव चव्हाण यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री सुनील तटकरे, अण्णासाहेब डांगे, आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, निवेदिता माने, प्रतिभा शरद पवार, सरोज पाटील, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, प्रा. राजन गवस, प्रा. अशोक चौसाळकर, मेघा पानसरे, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

नाव न घेता मोदींना टोला
भारताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विज्ञानवादी राज्यघटना स्वीकारली असताना आमचे सहकारी संसदेत जाताना पायरीवर डोके टेकून नमस्कार करतात, मगच संसदेत प्रवेश करतात. यालाच म्हणावे का विज्ञानवादी? असा टोला पवार यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
फेसबुक पेजचे उद्घाटन
यावेळी डॉ. प्रा. पद्मा पाटील आणि निहाल शिपूरकर यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला; तर राजर्षी शाहू प्रचार व प्रसार गु्रपतर्फे केलेल्या फेसबुक पेजचा आणि ‘शाहू आॅनलाईन क्विझ कॉम्पिटिशन’चे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Shahu's thoughts are needed to stop the deceptive attitude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.