कोल्हापूर : तमिळनाडू येथील त्रिची येथे तमिळनाडू बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या पहिल्या राष्ट्रीय शारीरिक विकलांग बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त बुद्धिबळपटू शैलेश नेर्लीकरने ७ पैकी ५ गुण व २४ बकोल्झ गुण मिळवून कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेत अग्रमानांकित फिडे मास्टर आंध्रप्रदेशच्या व्यंकटकृष्णा कार्तिकने ७ पैकी ६ गुण मिळवून सुवर्णपदक मिळविले, तर कर्नाटकच्या समर्थ रावने ५ गुण व २६.५ बकोल्झ गुणांसह रौप्यपदक मिळविले. ही स्पर्धा स्वीस लीग पद्धतीने एकूण ७ फेऱ्यांत घेण्यात आली. ६० टक्क्यांहून जास्त शारीरिक विकलांग असलेले बुद्धिबळपटूच या स्पर्धेसाठी पात्र होते. शंभर टक्के शारीरिक विकलांग असलेल्या महाराष्ट्राच्या शैलेशने पहिल्या फेरीत तमिळनाडूच्या मणीकंडन राजनगमचा पराभव करून आघाडी घेतली, परंतु दुसऱ्या फेरीत शैलेशला आंध्रप्रदेशच्या उदयकुमार तुमागुंटाकडून पराभूत व्हावे लागले. तिसऱ्या व चौथ्या फेरीत अनुक्रमे शैलेशने तमिळनाडूच्या महमदअली व हरिहरा सुदानवर विजय मिळवून पुन्हा आघाडी घेतली, परंतु पाचव्या फेरीत पाँडेचरीच्या सत्यामूर्तीकडून शैलेशला पराभव पत्कारावा लागला. सहाव्या फेरीत तमिळनाडूच्या ए. अंगापनवर मात करून शैलेशने अंतिम सातव्या फेरीत तमिळनाडूच्याच सेनथिलकुमार सुधर्मचा पराभव करून कांस्यपदक पटकाविले. रौप्यपदक विजेत्या कर्नाटकच्या समर्थ रावचे व शैलेशचे समान ५ गुण झाले परंतु टायब्रेकरमध्ये समर्थचे बकोल्झ गुण जास्त झाल्यामुळे शैलेशला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेसाठी शैलेशसोबत त्याची आई सरला नेर्लीकर गेल्या होत्या. शैलेशला प्रीतम घोडके, उत्कर्ष लोमटे यांचे प्रशिक्षण, तर विश्वविजय खानविलकर, प्रा. अरुण मराठे व सचिव भरत चौगुले यांचे विशेष प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.
शैलेश नेर्लीकरला कांस्यपदक
By admin | Published: April 22, 2015 12:43 AM