कोल्हापूर जिल्हा परिषदेचा परिसर चकाचक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:55 AM2018-09-25T10:55:17+5:302018-09-25T11:05:23+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी चार डंपर कचरा गोळा करण्यात आला. महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर, ते २ आॅक्टोबर २0१८ या कालावधीमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी चार डंपर कचरा गोळा करण्यात आला. महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर, ते २ आॅक्टोबर २0१८ या कालावधीमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला.
पाणी व स्वच्छता विभागामार्फत आयोजित या मोहिमेमध्ये श्रमदानासाठी सर्व खातेप्रमुख आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते. स्वच्छता श्रमदानासाठी सर्व विभागांना जिल्हा परिषद, परिसराचे वाटप करण्यात आले होते. त्याप्रमाणे सकाळी नऊ वाजता या श्रमदानास सुरुवात करण्यात आली. या उपक्रमासाठी बांधकाम विभागाने स्वच्छता साहित्याचा पुरवठा केला.
मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनीच हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेला सुरुवात केल्याने विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनीही हिरिरीने ही स्वच्छता मोहीम पार पाडली. जिल्हा परिषदेच्या पाठीमागील बाजू तसेच जुन्या कागलकर वाड्याजवळील सर्व कचरा या मोहिमेमध्ये गोळा करण्यात आला. याच पद्धतीने बाराही तालुक्यांमध्ये पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पंचायत समित्यांचा परिसर स्वच्छ केला.
दर मंगळवारी श्रमदान
यापुढे दर मंगळवारी सकाळी अशाच पद्धतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तेव्हा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ९ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.
जुन्या विहिरी, खणींमध्ये ७९८ गणेशमूर्ती विसर्जित
पाणी व स्वच्छता विभागाच्यावतीने सार्वजनिक मूर्ती नदीमध्ये विसर्जित न करता त्या प्रशासनाने ठरवलेल्या जुन्या विहिरीत किंवा खणीमध्ये विसर्जित कराव्यात, असे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यातील एकूण ७९८ सार्वजनिक आणि ३० घरगुती गणेशमूर्तींचे जुन्या विहिरींमध्ये विसर्जन करण्यात आल्याचे या विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी सांगितले.
तालुका आणि विसर्जित सार्वजनिक मूर्तींची संख्या खालीलप्रमाणे
आजरा (५१), भुदरगड (१८),चंदगड (११0),गगनबावडा (0),गडहिंग्लज (१८0), हातकणंगले (२३), कागल (७८), करवीर (६२), पन्हाळा (२८), राधानगरी (१८४), शाहूवाडी (७), शिरोळ(५७).