कोल्हापूर : ‘मी पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा तोडं काळे करून पुन्हा हिमालयात जाईन’ असे जाहीरपणे शरद पवार यांनी ‘वसंत’ व्याख्यानमालेत सांगितले होते. मग जयंत पाटील आता पवार यांना घेऊन हिमालयात जाणार का, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना विचारला.
पाटील म्हणाले, मी पराभूत झालो तर हिमालयात जाईन असे म्हणालो असताना जाणीवपूर्वक या शब्दाचा आधार घेऊन टीका केली जात आहे. नवनीत राणा या अपक्ष खासदार आहेत. त्यांना भाजपचा पाठिंबा नाही. परंतु त्या ज्या ‘इश्यू’वर बोलतात त्याबद्दल आम्ही मत मांडत आहोत. मंत्री अब्दुल सत्तार जे काही बोलले आहेत त्याची दखल हिंदू समाज घेईल. किरीट सोमय्या यांना जीवे मारण्याचाच प्रयत्न झाला आहे. त्यामुळे संबंधितांविरोधात ३०७ चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे.
मुख्यमंत्र्यांची हाताची घडीमहाराष्ट्राची देशभर बदनामी होत असताना मुख्यमंत्री हे हाताची घडी घालून बसले आहेत. त्यांनी बैठक बोलवावी. काही बाबतीत आचारसंहिता ठरवावी. भोंग्याबाबतच्या बैठकीला हे अनुपस्थित राहणार आणि देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनी उपस्थित रहावे अशी अपेक्षा करणार हे कसे शक्य आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेता म्हणून बोलण्यापेक्षा जरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मते मांडावीत.
मुश्रीफ, पाटील काठावर आलेत लक्षात ठेवा
राष्ट्रवादीच्या सभेचा संदर्भ देत पाटील म्हणाले, शरद पवार यांनी कोल्हापुरात जंगी सभा घेतली. पण, ते भाषणाला उभे राहिल्यानंतर लोक उठून जात होते. याच्या क्लिप व्हायरल होत आहेत. २०१४ ला त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यात दोनच आमदार होते. २०१९ ला तर हसन मुश्रीफ व राजेश पाटील हे काठावर निवडून आलेत. समरजित घाटगे यांनी ८८ हजार मते घेतली. म्हणजे तेवढ्या लोकांना राष्ट्रवादी नको आहे. २०१४ ला युतीचे आठ जण आले होते. राष्ट्रवादीच्या कोल्हापुरातील उमेदवाराला २०१४ साली स्वतंत्र लढल्यावर फक्त ८ हजार मते होती. तर भाजपच्या उमेदवाराला ४० हजारावर मते होती. मग कशाच्या जीवावर तुम्ही गमजा मारता असा सवाल त्यांनी पवार यांना विचारला.