शारदीय नवरात्रोत्सव: सातव्या माळेला अंबाबाईची शाकंभरी देवीच्या रुपात पूजा; देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 2, 2022 09:14 PM2022-10-02T21:14:04+5:302022-10-02T21:15:08+5:30
अंबाबाईचा नवरात्रोत्सव आता सांगतेच्या दिशेने सुरू आहे. त्यानिमित्त देवी शाकंभरीच्या रुपात सजली. स्कंदपुराण, सप्तशती, देवी भागवत, करवीर महात्म्य या ग्रंथात देवीचा उल्लेख येतो.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेला (रविवारी) कोल्हापुरातील श्री अंबाबाई देवीची कर्नाटकातील बदामी येथील श्री शाकंभरी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. रविवार सुटीचा दिवस असल्याने देशभरातील भाविकांनी मोठी गर्दी करत देवीचे दर्शन घेतले. सोमवारी अष्टमीची नगरप्रदक्षिणा असून, अंबाबाई नगरवासीयांना आशीर्वाद देण्यासाठी फुलांनी सजलेल्या वाहनातून येते. हा अलौकिक सोहळा अनुभवण्यासाठी अलोट गर्दी होते.
नवरात्रोत्सवाची सातवी माळ -
अंबाबाईचा नवरात्रोत्सव आता सांगतेच्या दिशेने सुरू आहे. त्यानिमित्त देवी शाकंभरीच्या रुपात सजली. स्कंदपुराण, सप्तशती, देवी भागवत, करवीर महात्म्य या ग्रंथात देवीचा उल्लेख येतो. गुहारण्य हे बदामीतील तिलकवन आहे. शाकंभरी देवी या पवित्र वनात वास करते, त्यामुळे तिला बनशंकरी किंवा वनशंकरी म्हणतात. काशीतून बाहेर पडलेले अगस्त्य ऋषी विंध्याला नमवून दक्षिणकाशी करवीर या तीर्थक्षेत्रात पत्नी लोपामुद्रेसह आले. तेव्हा करवीर निवासिनी श्री अंबाबाईने त्यांना येथे फक्त सहा महिने राहण्याची परवानगी दिली, त्यानंतर बनशंकरी येथे जाऊन तिची उपासना करावी, असा आदेश दिला. त्याप्रमाणे अगस्त्य ऋषी हे या दोन्ही क्षेत्रातील पौराणिक दुवा आहेत. शाकंभरीने अवर्षण व जलाभावामुळेमरणोन्मुख झालेल्या समस्त लोकांचे स्वत:च्या दिव्यशक्तीने स्वत:च्या देहापासून बनलेल्या शाकपत्रांनी भरणपोषण करून त्यांच्या प्राणाचे रक्षण केले. त्यामुळेच देवीचे नाव शाकंभरी असे प्रसिद्ध झाले. हा या पूजेमागील पौराणिक संदर्भ आहे. ही पूजा गजानन मुनीश्वर, रामकृष्ण मुनीश्वर, मुकूल मुनीश्वर व श्रीनिवास जोशी यांनी बांधली.
आज सोमवारी अष्टमीनिमित्त अंबाबाई मंदिरात मध्यरात्री जागराचा होम असतो. तत्पूर्वी अंबाबाईची उत्सवमूर्ती सजवलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणेला निघते. रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीने नगरप्रदक्षिणा सुरू होते. रात्री उशिरापर्यंत जागराचा होम होतो, त्यामुळे खंडेवनमीला मंदिर उशिरा उघडते..