उचगाव : मुसळधार पावसाने होत्या-नव्हत्या त्या आडोशाच्या चार भिंतीही गिळंकृत केल्याने उजळाईवाडीतील मंगल शंकरराव करांडे( बुरुड) या ६५ वर्षीय आजीवर उघड्यावरच संसार थाटण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे हक्काचं घरकुल मिळावं म्हूणन या आजीने असंख्य वेळा ग्रामपंचायतीच्या पायऱ्या झिजविल्या. मात्र, निडर प्रशासनालाही पाझर न फुटल्याने या आजीचा एका चंद्रमौळी झोपडीसाठी सुरू असलेला संघर्ष अद्यापही थांबलेला नाही. एकीकडे निसर्ग दया दाखवेना, तर दुसरीकडे प्रशासन दाद घेईना अशा दुहेरी संकटात सापडलेल्या या आजीसाठी आता दानशूरांनीच दातृत्वाची कवाडे खुली करणे गरजेचे बनले आहे. मंगल या उजळाईवाडीतील शाहू नाक्याच्या खालच्या बाजूस आपल्या मुलासोबत राहतात. वर्षभरापूर्वी पतीचे निधन झाल्याने संसाराची सारी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. १९८९ मध्ये बांधलेले त्यांचे घर गत महिन्यात आलेल्या पावसात पूर्णपणे ढासळले. हक्काचे छप्परच निसर्गाने हिरावून घेतल्याने या कुटुंबाला उघड्यावर संसार थाटण्याची वेळ आली. विशेष म्हणजे घर कोसळूनही पंचनामा करण्यासाठी कोणीच आले नसल्याची खंत मंगल कानडे व्यक्त करतात. राहतं घर पडल्याने मंगला या पडक्या भिंतीचा आसरा घेऊन जेवण बनवितात. त्यामुळे सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांनी त्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत करणे गरजेचे आहे.
चौकट :
हातापाया पडलो, पण...
उजळाईवाडी ग्रामपंचायतीकडे मागील वर्षी राहत्या जागेवर घरकुल मंजूर करा म्हणून मंगल या हातापाया पडल्या; पण त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. घरकुल मंजूर झाले; पण त्याचे अनुदान परत गेल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. शासनाने आता तरी आमच्या घराचा पंचनामा करून राहत्या जागेवर घरकुल मंजूर करावे, अशी मागणी कानडे यांनी केली.
फोटो : १९ उजळाईवाडी कानडे
उजळाईवाडीतील शाहू नाक्याशेजारी असलेल्या मंगल कानडे यांचे घर मुसळधार पावसात पडले आहे.