शिरोली : शिरोली ग्रामपंचायतीवर २०१७ मध्ये सत्तांतर झाल्यापासून ग्रामविकास अधिकारी पदाचा खेळखंडोबा सुरू असून, गेल्या दोन महिन्यांपासून तर ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या शिरोली ग्रामपंचायतीचा कारभार राम भरोसे सुरू आहे. यामुळे विकासकामांना खोळ बसलाच आहे आणि नागरिकांना विविध दाखल्यांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
शिरोली ग्रामपंचायतीवर २०१७ मध्ये सत्तांतर झाल्यापासून ग्रामविकास अधिकारी पदाचा खेळखंडोबा सुरू आहे. अभ्यासू ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांनाच मुदतवाढ मिळावी, म्हणून शाहू आघाडीने प्रयत्न केले; मात्र कठारे यांची नागावमध्ये बदली झाली. त्यानंतर एम. आर. पाटील यांनी पदभार स्वीकारला; मात्र त्यांच्या कार्यप्रणालीवर आघाडी नाराज होती आणि अशोक मुसळे यांनी काही दिवस पदभार स्वीकारला.
जिल्हा परिषदेत सत्तांतर होताच आघाडीने पुन्हा कठारे यांना आणले; कठारे यांनी पुन्हा पदभार स्वीकारला. मात्र एकाच अधिकाऱ्यांची पुन्हा त्याच ग्रामपंचायतीत नेमणूक करता येत नाही. ही चूक सुधारत कठारे यांची प्रशासनाने बदली केली. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आर. सी. पाटील यांनी पदभार स्वीकारला. मात्र, त्यांनीही रजा टाकून बदलीसाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. गेल्या तीन वर्षांत पाच ग्रामविकास अधिकारी आले आणि गेले; पण एकही थांबायला तयार नाही. ग्रामविकास अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत रुचेना की ग्रामपंचायतीच्या कारभारी मंडळींना ग्रामविकास अधिकाऱ्यांचे कामकाज पसंत पडेना; पण यामुळे गावातील सुरू असलेल्या विकासकामांना खो बसला आहे. तसेच नागरिकांची गैरसोय होत आहे.
पाटोल यांच्या रजा कालवधीत हालोंडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देत असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कळवले; मात्र निवडणुकीचे कारण देत तेही फिरकले नाहीत. त्यानंतर चंदगड तालुक्यातून ग्रामविकास अधिकारी येणार असल्याचे सांगण्यात आले; परंतु ते अद्याप आलेले नाहीत.