शिरोलीचा शेलारमामा दत्तू पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:26 AM2021-09-21T04:26:03+5:302021-09-21T04:26:03+5:30
सावरवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांवरील अपार श्रद्धेपोटी मर्दानी खेळाच्या माध्यमातून गेली आठ दशके इतिहास जपणारे शिरोली दुमाला (ता. करवीर) ...
सावरवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांवरील अपार श्रद्धेपोटी मर्दानी खेळाच्या माध्यमातून गेली आठ दशके इतिहास जपणारे शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील दत्तू विठू पाटील यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पाटील यांना लहान वयातच कुस्तीसह मर्दानी खेळाची आवड निर्माण झाली. त्यांनी हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करून कुस्तीसह मर्दानी खेळाचा छंद जोपासला. काही काळातच ते गोपाळ पाटील यांच्याकडून भालाफेक, दांडपट्टा, लाठी, ढाल, तलवार, दोरी बंदाणी, तिकाटणी आदी प्रकारामध्ये निष्णात बनले. कित्येक कार्यक्रम त्यांनी या कलागुणांनी गाजविले. अनेक शालेय तसेच युवक-युवती त्यांच्या मार्गदर्शनाखाली यात पारंगत झाले. हा सेवभाव त्यांनी आयुष्यभर जपला. साधा आणि सरळ स्वभाव असलेल्या पाटील यांनी खासदार संभाजीराजेंच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्यात रायगडावर गेली सात ते आठ वर्षे मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवून चुणूक दाखविली. या सोहळ्यातूनच ते शेलारमामा म्हणून ओळखू लागले. नवी दिल्लीतील शिवजयंती सोहळ्यात त्यांनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवून वाहवा मिळवली. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती रायगड, कोल्हापूर दसरा महोत्सव ट्रस्ट यांच्यावतीने ही त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.
(फोटो - दत्तू विठू पाटील)