शिरोळचा कृष्णाकाठ नामशेषच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2016 11:43 PM2016-04-08T23:43:16+5:302016-04-09T00:01:50+5:30
प्रशासनाकडून कारवाईचा फार्स : मळीच्या मातीची लूट सुरूच--कृष्णाकाठचं दुखणं
संतोष बामणे -- जयसिंगपूर -शिरोळ तालुक्यात कृष्णा, वारणा, दुधगंगा, पंचगंगा अशा चार नद्यांचे विस्तृत मातीचे मैदान आहे़ या नद्यांच्या काठावरील असलेल्या मातीचा वापर वीट व्यवसायासाठी कच्चा माल म्हणून केला जातो़ कृष्णा नदीकाठावरील मळीची माती मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्यांसाठी वापरली असल्यामुळे नदीकाठावरील असलेल्या गावांना पुराचा धोका व मळीघाट नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नियमबाह्य मातीचे उत्खनन सुरू आहे़
गेल्या १० ते १५ वर्षांपासून शिरोळ तालुक्यातील नदीकाठावर मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन रात्रंदिवस राजरोसपणे सुरू आहे. नदीचे संवर्धन टिकविण्यासाठी उपाययोजना न करता उदगाव, चिंचवाड या मळी परिसरात नियमबाह्य माती उत्खनन सुरू आहे़ ५० मीटरपर्यंत परवाना नसतानाही बेकायदेशीरपणे उत्खनन होत आहे़
मळी परिसरात अनेक वीटभट्ट्या असून येथून लाल मातीची इतर ठिकाणी साठवणूकही केली जाते़ उदगाव-चिंचवाड परिसरात २४ जणांनी वीटभट्टीकरिता माती उत्खननाची परवानगी घेतली होती़ दरम्यान, माती उत्खननाची मुदत संपल्यानंतर त्यांना माती उत्खननासाठी दिलेल्या गट नंबरची मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यामार्फत मोजणी झाली़ यामध्ये २४ जणांनी परवानगीपेक्षा जास्त माती उत्खनन केल्याचे आढळून आले होते़
मोठ्या प्रमाणात नियमबाह्य माती उपसा केल्यामुळे शेतीपिकांचे नुकसान, त्याचबरोबर रस्त्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे़ एकीकडे राज्य शासन पर्यावरणाच्या दृष्टीने संवर्धनासाठी विविध योजना राबवीत आहे़, तर दुसरीकडे अशा प्रकारच्या माती उत्खननामुळे कृष्णाकाठ काळाआड जाण्याची शक्यता आहे़ माती उत्खनन नियमबाह्य केल्यामुळे नदीचे पात्रास अतिवृष्टी व मोठ्या पावसामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार आहे़ त्याचबरोबर शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे़ याला महसूल विभागाने झोपेचे सोंग घेतल्याचे दिसत आहे़ (पूर्वार्ध)
उदगाव, चिंचवाड परिसरातील बेसुमार माती उत्खनन हे नियमबाह्य होत असून प्रशासनाला या गोष्टी माहीत असूनसुद्धा माती उत्खननाकडे दुर्लक्ष करीत आहे़ त्यामुळे या परिसरातील गावांना पुराचा धोका व जॅकवेल, इलेक्ट्रिक टॉवर आदींना धोका निर्माण झाला आहे़ तक्रारी देऊनही शासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे़ त्वरित नियमबाह्य होत असलेले माती उत्खनन थांबवावे़
- शरद चव्हाण, चिंचवाड
प्रशासनाचे दुर्लक्ष
शासनाचा महसूल भरतो, मग माती उपसायची का नाही, असे म्हणत हजारो ब्रास मातीचे उत्खनन उदगाव, चिंचवाड परिसरात झाले आहे़ यातूनच वीटभट्टीमालकांना मोठा फायदा होताना दिसत आहे़ दरम्यान, प्रशासनाने पाहणी करून मातीचे उत्खनन किती केले आहे यावर कार्यवाही न करताच प्रशासनाची उंटावरील राखणही त्याला साथ देत असल्याची चर्चा उदगाव, चिंचवाडमधून होत आहे़