जागेअभावी शिरोलीतील कचऱ्याचा प्रश्न गंभीर

By admin | Published: December 9, 2015 09:31 PM2015-12-09T21:31:48+5:302015-12-10T01:03:25+5:30

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : दररोज पाच टन गोळा होणारा कचरा टाकायचा कुठे ?

Shiromani Waste Question: Serious | जागेअभावी शिरोलीतील कचऱ्याचा प्रश्न गंभीर

जागेअभावी शिरोलीतील कचऱ्याचा प्रश्न गंभीर

Next

शिरोली : शिरोली ग्रामपंचायतीकडे घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा नसल्याने गावातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे; पण याकडे लोकप्रतिनिधींचे मात्र लक्ष नाही. शिरोली एमआयडीसीमुळे गावचा विस्तार वाढला आहे. गावभागाबरोबर माळवाडी, शिवाजीनगर, यादववाडी, सांगली फाटा जैन मंदिरापर्यंत गावाचा विस्तार झाला आहे. गावची लोकसंख्या सुमारे चाळीस हजारांवर पोहोचली आहे. एमआयडीसीमुळे गावची लोकसंख्या वाढली. गावातील व परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला. सोबत हॉटेल, ट्रान्सपोर्ट, विविध मार्केट, गोदामे आल्याने प्रदूषणही वाढू लागले. सध्या गावात घन कचऱ्याचा प्रश्न उद्भवू लागला असून, घनकचरा कुठेही पडू लागला आहे. तो कुजून दुर्गंधी पसरल्याने ग्रामपंचायतीने तीन वर्षांपूर्वी कचरा उठावासाठी तीन घंटागाडी खरेदी केल्या. त्याच्या मदतीने गावातील गोळा होणारा कचरा उचलून एमआयडीसीतील ओपन स्पेस असलेल्या खड्ड्यात टाकण्यास सुरू केले. पंचगंगा नदी शेजारी हा कचरा टाकण्यात येऊ लागला. गेली पाच वर्षे याठिकाणी कचरा टाकला जात आहे; पण एमआयडीसीने ही जागा महावितरण कंपनीला सबस्टेशन उभारण्यासाठी दिली आहे. महावितरण कंपनीने या जागेवर कचरा टाकू नये म्हणून फलक लावत रस्त्यावर चर मारली होती. त्यामुळे रविवारी कचरा उचलला गेला नाही; पण ग्रामपंचायतीने सोमवारी चर मुजवून पुन्हा कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. पण, भविष्याच्यादृष्टीने कचऱ्याचा प्रश्न उद्भवणार आहे. कारण दररोज पाच टन गोळा होणारा कचरा टाकायचा कुठे? हाही मोठा प्रश्न ग्रामपंचायतीसमोर आहे. (वार्ताहर)

याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी ही जागा एमआयडीसीची आहे आणि आमच्या जागेवर कचरा टाकू नये म्हणून ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेशी पत्र व्यवहार केला आहे.
- औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी


शिरोली गावाने औद्योगिक वसाहत स्थापन्यासाठी जागा दिली; पण सध्या आमच्याकडे कचरा टाकण्यासाठीदेखील जागा नाही. आम्ही ओपन स्पेसवरती मोठ्या खड्ड्यात कचरा टाकतो. ही जागा आम्हाला द्यावी, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. - बिस्मिल्ला महात, सरपंच


गेल्या पाच वर्षांपासून याठिकाणी कचरा टाकला जातो आहे, ही जागा आम्हाला कचरा टाकण्यासाठी मिळावी म्हणून औद्योगिक विकास महामंडळाला निवेदन दिले आहे. तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटून ही जागा आम्हाला द्यावी, अशी मागणी करणार आहे.
- सुरेश यादव, ग्रामपंचायत सदस्य

Web Title: Shiromani Waste Question: Serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.