कोल्हापूर : कागलविधानसभा मतदार संघावर शिवसेनेचा नैसर्गिक हक्क असून, ही जागा आपल्याच पक्षाला मिळावी, असा दावा गेल्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार माजी आमदार संजय घाटगे यांनी केला. त्यांनी मुंबईत जाऊन पक्षाच्या निवडणूक समन्वय समितीचे नेते खासदार अनिल देसाई व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली.
त्यांनीही ही जागा काही झाले तरी शिवसेनेलाच मिळेल, असा विश्वास व्यक्त केला; त्यामुळे कागलच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या मतदारसंघातून भाजपकडून शाहू समूहाचे प्रमुख समरजित घाटगे यांनी जोरदार तयारी केली आहे. उमेदवारीवरून पेच निर्माण झाल्यास त्यांच्यापुढे अडचणी निर्माण होऊ शकतात.जिल्ह्यातील १0 पैकी शिवसेनेच्या सहा आमदारांच्या जागा त्या पक्षाला मिळतील व राहिलेली कागल आणि चंदगडची जागा भाजपला मिळेल, असा दावा भाजपकडून केला जात होता; परंतु या दोन्ही मतदार संघाबद्दलचा गुंता तयार झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर घाटगे, दत्तोपंत वालावलकर, धनराज घाटगे, के. के. पाटील कौलगे व महेश देशपांडे यांनी गेले दोन दिवस मुंबईत जाऊन या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
शिवसेनेकडून भाजपला जी मतदारसंघांची यादी देण्यात आली आहे. त्यामध्येही कागल शिवसेनेकडेच असून हा मतदारसंघ सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असेही खासदार देसाई यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने गेल्या निवडणुकीत ज्या जागा लढविल्या, त्यामध्ये १५ व्या क्रमांकाची एक लाख १६ हजार मते घाटगे यांना मिळाली आहेत.
एक लाखाहून अधिक मते मिळूनही पराभव पदरी आलेले फारच कमी उमेदवार राज्यात आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपच्या परशुराम तावरे यांना अवघी पाच हजार मते मिळाली आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही अंबरीश घाटगे यांना एकट्याला जेवढी मते मिळाली आहेत, तेवढी भाजपला सगळी मिळून मिळालेली नाहीत, असे घाटगे यांनी नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले. पक्षाची एवढी मजबूत स्थिती असताना आणि मी स्वत: लढायला तयार असल्याने हा मतदारसंघ भाजपला देऊ नये, असा आग्रह घाटगे यांनी नेत्यांकडे धरला.