कोल्हापूर : राज्यातील ‘हिंद केसरी’सह ‘महाराष्ट्र केसरीं’ना प्रतिमहिना ६ हजार रुपये इतके राज्य शासनाकडून मानधन दिले जाते. मात्र, गेल्या मार्च महिन्यापासून हे मानधन त्यांना मिळाले नाही. याबाबत बुधवारी शिवसेनेने शिवाजी स्टेडियम येथील जिल्हा क्रीडा कार्यालयास टाळे ठोकत जाब विचारला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी चांगलेच फैलावर घेतले.एखाद्या कुस्तीगीर यशाच्या शिखरावर असतो तेव्हा त्याची आर्थिक स्थिती चांगली असते. मात्र, उतारवयात उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नसल्याने आर्थिक स्थिती बिकट बनते. त्यावेळी त्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून राज्य शासनाच्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयातर्फे ‘हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरीं’ना मानधन देण्यात येते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हे मानधन लालफितीच्या कारभारात अडकले आहे. त्यामुळे पैलवानांना हे मानधन मिळू शकलेले नाही.
या कारणावरून शिवसेनेने बुधवारी दुपारी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांसमोर आंदोलन केले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी राजेंद्र घाडगे यांनी काही तांत्रिक बाबींमुळे मानधन थकल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, तुमचा पगार थकला तर चालतो का ? ज्या पैलवानांनी कोल्हापूरचे आणि देशाचे नाव जगभर केले त्यांचे मानधन कसे थकवता ? कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आहे आणि अशा कोल्हापूरमध्ये पैलवानांचे मानधन थकविणे ही शरमेची बाब आहे तर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी आधी मानधन द्या आणि मग चर्चा करा, अशी भूमिका घेतली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांनाच टाळे ठोकण्यास भाग पाडले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष रवी चौगले, दुर्गेश लिंग्रस, अवधूत साळोखे, कमलाकर जगदाळे, राजेंद्र पाटील, रणजित आयरेकर, दिलीप देसाई, धनाजी यादव, भगवान कदम, अमित कांबळे, दीपक कानडे, प्रतीक क्षीरसागर, चंदू भोसले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
लोकमत इफेक्ट
‘ज्येष्ठ मल्लांचे मानधन मार्चपासून रखडले’ ही बातमी ‘लोकमत’ने बुधवारी प्रसिद्ध करताच जिल्हा शिवसेनेने याबाबत आंदोलन करत जिल्हा क्रीडा कार्यालयास टाळे ठोकले. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर हालचाली होऊन मानधन येत्या दोन-तीन दिवसांत देण्याची व्यवस्था करण्याची ग्वाही अधिकाºयांनी दिली.
येत्या दोन-दिवसांत मानधन जमा होईलएप्रिल, मे, जून, जुलै, आॅगस्टपर्यंतचे मानधन तांत्रिक कारणांमुळे रखडले होते. बुधवारी याबाबत वरिष्ठ कार्यालयास कळविल्यानंतर हे मानधन येत्या २- ३ दिवसांत जमा होईल.- माणिक वाघमारे,जिल्हा क्रीडाधिकारी , कोल्हापूर