शिवसेनेची कामगिरी जिव्हारी
By admin | Published: November 4, 2015 11:30 PM2015-11-04T23:30:35+5:302015-11-04T23:30:35+5:30
अहवाल मागितला : राज्यपातळीवरील नेत्यांच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक प्रचारात आक्रमक राहिलेल्या शिवसेनेने ‘४१ प्लस’चा नारा दिला; पण, अवघ्या चार जागा मिळाल्या. लाजिरवाण्या पराभवाची ही कामगिरी सेनेला जिव्हारी लागली आहे. नेमके काय चुकले, कुठे कमी पडलो, याचा अहवाल वरिष्ठांनी दोन दिवसांत सादर करण्याच्या सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना दिल्या आहेत.
लढविलेल्या ८१ जागांपैकी अवघे चार उमेदवार निवडून आले. उमेदवारांना एकूण ४४ हजार ३५४ मते पडली असून त्यांची एकत्रित मतदानांच्या तुलनेत टक्केवारी १४.२१ इतकी आहे. कोल्हापुरातील सेनेची ही कामगिरी राज्य पातळीवरील सेनेचे नेते, पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे. याबाबत वरिष्ठांनी लेखी अहवाल मागितला असून, तो दोन दिवसांत सादर करण्याची सूचना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना मंगळवारी दुपारी दिली.
दोन दिवसांत अहवाल देणार
प्रभागनिहाय शिवसेनेला झालेले मतदान. शंभर, दोनशे आणि एक हजारच्या टप्प्यातील किती उमेदवार आहेत. उमेदवारांच्या पराभवाची कारणे, कमी मतदानाचा फटका कशामुळे बसला, अशा विविध मुद्द्यांवर आधारित अहवाल वरिष्ठांनी मागितला असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे दोन दिवसांत अहवाल सादर केला जाईल.
पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार कार्यवाही
भाजपसमवेत जाणे हे ‘जर-तर’च्या गोष्टी आहेत. सध्या तरी, याबाबतचा विचार केलेला नाही. मुंबईतील बैठकीत कोल्हापूरच्या स्थितीबाबत चर्चा झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.