कोल्हापूर : रेकॉर्ड डान्स म्हणजेच स्नेहसंमेलन अशा समीकरणात गुरफटलेल्या विविध शाळांसाठी वस्तुपाठ घालून देणारे स्नेहसंमेलन यंदा कोल्हापुरातील शिवाजी मराठा हायस्कूलने घालून देण्याचा निर्धार केला आहे. या शाळेने १९ आणि २० डिसेंबर रोजी या शाळेमध्ये बालस्नेहसंमेलन भरविण्याचे आयोजन केले आहे. रेकॉर्ड डान्सला फाटा देत या संमेलनात ग्रंथदिंडी, वाचनकट्टा, कथाकथन, काव्यवाचन, मुलांच्या भावविश्वाशी संबंधित लघुपट, लोकनृत्य असे बहुविध कार्यक्रम होणार आहेत. विशेष म्हणजे या संमेलनाचे सारे सूत्रसंचालनही विद्यार्थीच करणार आहेत.शाळेतील स्नेहसंमेलन पारंपरिक पद्धतीने पार पडतात. विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा साचाही ठरलेला असतो; परंतु प्रामुख्याने त्यात ध्वनिफितीतील गाणी, चित्रपटांतील संवाद, एकांकिका यांचा भडिमार असतो; परंतु शिवाजी मराठा हायस्कूलचे विद्यार्थीच यंदा शाळेच्या प्रांगणात भरविणार असलेल्या बालसंमेलनाचे संयोजक असून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत.
याशिवाय ग्रंथदिंडीचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी विश्वास सुतार, ‘वाचनकट्ट्या’वरील १०० साहित्यिकांच्या पुस्तकांच्या स्टॉलचे उद्घाटन ‘वाचनकट्टा’चे संकल्पक युवराज कदम, तर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी निगडित लघुपट प्रदर्शनाचे उद्घाटन ‘बलुतं’ लघुपटाचे दिग्दर्शिक अजय कुरणे यांच्या हस्ते होणार आहे.
संमेलनस्थळी स्वागतकमानबालसाहित्याचे विश्व दर्शविणारी स्वागतकमानही उभी करण्यात आली आहे. शाळेतील दोन मोठ्या खोल्यांत दोन प्रदर्शने भरविण्यात येणार आहेत. एका खोलीत शंभर साहित्यिकांची चित्रांसह माहिती, तर दुसऱ्या खोलीत चिंचवाड हायस्कूल येथील शिक्षक आणि संग्राहक उत्तम तलवार यांच्या हस्ताक्षरांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
ग्रंथदिंडीत वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थीग्रंथदिंडीत वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थी सहभागी होतील. पालखीत संविधानाची प्रत, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, महात्मा फुले समग्र वाङ्मय असेल. विठ्ठल-रुक्मिणीच्या रूपातील विद्यार्थी ‘आम्हांला शिकू द्या,’ असा संदेश देत सजविलेल्या एक्का गाडीतून मिरवणुकीत सहभागी होतील.
विद्यार्थीच स्वागताध्यक्ष असून या संमेलनाचे नियोजन, सूत्रसंचालन, परिचय, आभार, अल्पोपाहार, व्यासपीठ नियोजन, पाहुण्यांचे स्वागत, आदींची जबाबदारी विद्यार्थीच पार पाडणार आहेत. मुख्याध्यापक पी. डी. काटकर, कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्यासह सर्वच शिक्षक त्यांना मदत करणार आहेत.
तयारी झाली पूर्णशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या संमेलनाची तयारी पूर्ण केली असून तयार केलेल्या ‘वाचनकट्ट्या’वर वाचन चळवळीतील कार्यकर्ते आणि ऋग्वेद प्रकाशनाचे सुभाष विभूते, अक्षरदालन प्रकाशनाच्या वतीने संमेलनस्थळी बालसाहित्याच्या पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. १०० साहित्यिकांची पुस्तके या स्टॉलवर असणारआहेत.
असे असतील कार्यक्रमदि. १९ डिसेंबर २०१७सकाळी ९ वा. ग्रंथदिंडी : उद्घाटक, विश्वास सुतार (प्रशासनाधिकारी, महानगरपालिका)सकाळी १० वा. पुस्तक स्टॉल : उद्घाटक, युवराज कदम (संकल्पक, वाचनकट्टा चळवळ)साहित्यिकांचे माहिती प्रदर्शन : उद्घाटक - प्रा. ए. के. शिंदेसंग्राहक उत्तम तलवार यांचे हस्ताक्षर प्रदर्शन : उद्घाटक, तानाजी अस्वले (चित्रकार, कलाशिक्षक)
स. ११ वा. बाल स्नेहसंमेलन : उद्घाटक, राजन गवस (मराठी विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ)दु. १२.३० : पहिले सत्र : कथाकथन (विद्यार्थी आणि टी. आर. गुरव, चंद्रकांत निकाडे)दु. ३ : दुसरे सत्र : काव्यवाचन (विद्यार्थी आणि कवी बबलू वडार)दि. २० डिसेंबर २०१७ :स. ९ वा. : पहिले सत्र -फन फेअर (सहभागी सर्व विद्यार्थी)दु. १२ वा. : दुसरे सत्र - मुलांच्या भावविश्वाशी निगडित लघुपट (उद्घाटक : अजय कुरणे, दिग्दर्शक)दु. ३ वा. : तिसरे सत्र -लोकनृत्य (सहभागी सर्व विद्यार्थी)