कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा निकाल तीनवेळा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून दि. १३ जुलैला पहिल्यांदा या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर पंधरा दिवसांनी या निकालामध्ये आॅनलाईन बदल करण्यात आला. पुन्हा दि. १८ सप्टेंबरला निकाल जाहीर करण्यात आला.
विद्यापीठाकडून तीनवेळा निकालात झालेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पहिल्यांदा जाहीर झालेल्या निकालातील उत्तीर्ण विद्यार्थी हे अखेरच्या निकालात अनुत्तीर्ण झाले आहेत.
विद्यापीठाने या अभ्यासक्रमासाठी चार विषयांची एटीकेटी रद्द करून तीन विषयांसाठी केली आहे. दरम्यान, या अभ्यासक्रमाच्या निकालात तीनवेळा झालेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.
निकालातील बदलांबाबत विचारणा केली असता विद्यार्थ्यांना नेमकी माहिती विद्यापीठाकडून मिळत नाही. विद्यापीठाने येत्या दोन दिवसांत निकालाबाबतची सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष ऋतुराज माने यांनी सोमवारी दिला.
अभ्यास मंडळाच्या नियमानुसार निकालविद्यापीठातील ‘एमबीए’च्या अभ्यास मंडळाच्या परीक्षा पद्धतीबाबतचे नियम आणि मार्गदर्शक सूचनांनुसार निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत अभ्यास मंडळ आणि अधिकार मंडळे जो निर्णय घेतील त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले.