शिवाजीराव कदम यांना रा. कृ. कणबरकर पुरस्कार जाहीर
By समीर देशपांडे | Published: March 31, 2023 06:08 PM2023-03-31T18:08:16+5:302023-03-31T18:10:35+5:30
याआधी प्रा. सी.एन.आर. राव, रयत शिक्षण संस्था, सातारा, डॉ. जब्बार पटेल, प्रा. एन.डी. पाटील, आणि डॉ. डी.वाय. पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव श्रीपतराव कदम यांना जाहीर करण्यात आला आहे. सिक्कीमचे माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते येत्या १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता सिनेट सभागृहात हा पुरस्कार प्रदान समारंभ होईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. १ लाख ५१ हजार रूपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
डॉ. शिर्के म्हणाले, कणबरकर राष्ट्रीय पुरस्काराच्या शोध समितीने सन २०२३ च्या पुरस्कारासाठी कदम यांची एकमताने निवड केली. डॉ. कदम यांनी एक प्रभावी शिक्षणतज्ज्ञ, कुशल शैक्षणिक प्रशासक, एक उत्साही संशोधक आणि तळमळीचा समाजसेवक म्हणून दिलेले योगदान लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. याआधी प्रा. सी.एन.आर. राव, रयत शिक्षण संस्था, सातारा, डॉ. जब्बार पटेल, प्रा. एन.डी. पाटील, आणि डॉ. डी.वाय. पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेला प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, शोध समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. बी.ए. खोत उपस्थित होते.