शिवभक्ताला सलाम; २४ वर्षे विनामोबदला करतोय शिवरायांच्या पुतळ्याची देखभाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:49 AM2019-02-19T00:49:20+5:302019-02-19T15:20:39+5:30
गेली २४ वर्षे न चुकता दररोज सकाळी नगरपरिषदेसमोर असणाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विनामोबदला निगा राखत पूजन करून आपल्या दिवसाची सुरुवात करणारा सच्चा शिवभक्त मुरगूडमध्ये कार्यरत आहे.
अनिल पाटील
मुरगूड : गेली २४ वर्षे न चुकता दररोज सकाळी नगरपरिषदेसमोर असणाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विनामोबदला निगा राखत पूजन करून आपल्या दिवसाची सुरुवात करणारा सच्चा शिवभक्त मुरगूड (ता. कागल)मध्ये कार्यरत आहे. व्यवसायाने परीट असलेल्या, शिवभक्तीने झपाटलेल्या या तरुणाचे नाव आहे धोंडिराम पांडुरंग परीट-शिंदे.
पुतळ्याच्या सेवेमध्ये खंड पडू नये म्हणून धोंडिराम परीट परगावी जाण्याचेही टाळतात. सकाळी स्नान आटोपून सायकलला एका बाजूला झाडू तर एका बाजूला हार, हातामध्ये पाण्याची बादली, खांद्यावर परीट घडीचा टॉवेलसह घरातून थेट नगरपालिकेच्या प्रांगणातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळच ते येतात. तेथून अर्धा तास संपूर्ण परिसर झाडून काढणे, पाणी मारणे, त्यानंतर पुतळ्याची स्वच्छता, जलाभिषेक केल्यानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या नावाचा जयजयकार करून मग ही स्वारी आपल्या दुकानाकडे जाते.
विशेष म्हणजे आपल्या तुटपुंज्या मिळकतीत दैनंदिन थोडा निधी बाजूला काढून त्या निधीतून प्रत्येकवर्षी ते शिवजयंतीदिनी आपल्या दुकानाच्या दारासमोर शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करतात. परीट यांचा हा उपक्रम सध्या लोकोत्सव म्हणून साजरा होत आहे. सध्या शहरातील अनेक नागरिक यासाठी सढळ हाताने मदत करत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते शिवजयंती दिवशी वेगवेगळे उपक्रम साजरे करतात. समाजामध्ये चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवप्रतिमा देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार तसेच दरवर्षी एका विषयावर नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी व्याख्यान आयोजित केले जाते. यावेळी बोलताना ते म्हणाले, शिवपुतळ्याच्या अखंडित सेवेमुळे आपल्याला वेगळीच ऊर्जा प्राप्त होते.
मुरगूड नगरपालिकेच्या आवारात एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना रात्रीच्या वेळी मित्रासह शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच शेकोटी करत होतो. यावेळी पुतळ्यावर बरीच धूळ साचलेली दिसली. त्यावेळी वर्षातून एकदाच शिवजयंतीला शिवरायांचा जयजयकार होतो; पण वर्षभर मात्र या पुतळ्याकडे दुर्लक्ष होते. शिवाजीराजे केवळ जयंतीसाठीच आहेत का? असा प्रश्न पडला. त्याचक्षणी ठरवले की आजपासून दररोज पुतळ्याची स्वच्छता करायची. त्या दिवसापासून गेली २४ वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सेवा करत आलोय.
- धोंडिराम परीट-शिंदे