कोल्हापूर : अठरापगड जातींमध्ये विखुरलेल्या एतद्देशीय भूमिपुत्रांची गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वातंत्र्य आणि सहिष्णुता या मूल्यांवर महाराजांचे स्वराज्य अधिष्ठित होते, असे प्रतिपादन इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी रविवारी येथे केले.शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. रयतेची काळजी वाहणारा शिवाजी महाराजांसारखा दुसरा राजा जगाच्या पाठीवर झाला नाही. म्हणूनच त्यांना राष्ट्रनिर्माता म्हटले जाते. शेतकऱ्यांना हरतऱ्हेने मदत करण्याचे धोरण त्यांनी राबविले. परचक्राच्या कालखंडात प्रजेला आसरा देण्यासाठी किल्ल्यांचा वापर करणारा शिवाजी महाराजांसारखा अन्य राजा होणे नाही. म्हणूनच आजही भूमिपुत्रांच्या मनात त्यांच्याविषयीचा आदरभाव कमालीचा ओसंडून वाहत असल्याचे सावंत यांनी सांगितले.
धार्मिक सहिष्णुता, रयतेप्रति कळवळा, कर्तव्यकठोर पण सर्वसामान्य व्यक्ती केंद्रस्थानी असणारी प्रशासकीय व्यवस्था, प्रजेसाठी धनधान्य वाटपापासून ते जल व्यवस्थापनापर्यंत सर्व गोष्टींची काळजी वाहणारी महसुली व्यवस्था ही शिवरायांच्या स्वराज्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये होती. स्वराज्याची संकल्पना म्हणजे लोकशाही प्रस्थापना अशी होती. शिवाजी विद्यापीठ महाराजांचा वारसा कसोशीने जोपासण्याचा प्रयत्न करत असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.शिवपुतळ्याला अभिवादनशिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याला सकाळी अकरा वाजता कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, आदींनी अभिवादन केले. यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे, आदी उपस्थित होते. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत यांचे सामूहिक गायन यावेळी करण्यात आले.