कोल्हापूर : विविध मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, स्पीकरवर लावण्यात आलेले पोवाडे, अंगणात रेखाटलेल्या आकर्षक रांगोळ्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सरदार, मावळ्यांच्या वेशभूषेतील वावर अशा शिवमय वातावरणात रविवारी सकाळी नऊ वाजता येथील जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन साजरा झाला.
दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून पूजन करण्यात आले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयात ६ जून हा दिवस शासकीय शिवस्वराज्यदिन साजरा केला जातो. यावर्षी कोरोनाचा संसर्ग असतानाही जि. प. मध्ये हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मावळ्यांच्या गणवेशात तर महिला अधिकारी नऊवारी साडी परिधान करून लक्ष वेधले. जि. प. कला मंचमधील कलाकारांनी राष्ट्रगीत तर रणदिवेवाडी येथील शाहीर संकपाळ हायस्कूल राजू भोसले, प्रदीप सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडा, महाराष्ट्र गीत सादर केले. संदीप मगदूम आणि सुषमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण, अर्थ समितीचे सभापती प्रवीण यादव, महिला, बालकल्याण समितीच्या सभापती डॉ. पद्माराणी पाटील, समाजकल्याण समितीच्या सभापती स्वाती सासणे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक रवी शिवदास यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.