पावसाच्या सरी झेलत गणेशोत्सवाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 05:38 PM2017-08-24T17:38:37+5:302017-08-24T17:38:52+5:30
कोल्हापूर : सुखकर्त्या गणरायाच्या आगमनाला आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. लाडक्या बाप्पांच्या आराशीसाठी पावसाच्या सरी झेलत कोल्हापूरकरांनी साहित्याची खरेदी केली. दिवसभर थांबून-थांबून पडणाºया पावसाच्या मूडनुसार आपली वेळ ठरवीत नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली. संध्याकाळी पाऊस थांबल्यानंतर पुन्हा महाद्वार रोड, पापाची तिकटी परिसर नागरिकांच्याही अलोट गर्दीने फुलून गेला.
कोल्हापूर : सुखकर्त्या गणरायाच्या आगमनाला आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. लाडक्या बाप्पांच्या आराशीसाठी पावसाच्या सरी झेलत कोल्हापूरकरांनी साहित्याची खरेदी केली. दिवसभर थांबून-थांबून पडणाºया पावसाच्या मूडनुसार आपली वेळ ठरवीत नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली. संध्याकाळी पाऊस थांबल्यानंतर पुन्हा महाद्वार रोड, पापाची तिकटी परिसर नागरिकांच्याही अलोट गर्दीने फुलून गेला.
गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने नेमका गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून सकाळपासूनच हजेरी लावल्याने माळ्यावर गेलेले रेनकोटसारखे पावसाळी कपडे पुन्हा खाली आले. लाडक्या गणरायाच्या आगमनाला आताकाही तासांचा अवधी राहिल्याने घराघरांत उत्साहाचे, मांगल्याचे वातावरण आहे. घराघरांतील साफसफाई पूर्ण होऊन ठरलेल्या ठिकाणी श्री गणेशाच्या आराशीची मांडणी केली जात आहे.
गतवर्षी व्यवस्थित बंदिस्त करून ठेवलेल्या विद्युतमाळा, झुंबर, विद्युत रोषणाईचे साहित्य अशा सगळ्या ठेवणीतील वस्तू बाहेर येऊन त्यांची सजावट केली जात आहे. गणेशाच्या आगमनादिवशी कोणत्या पक्वान्नांचा बेत करायचा यावर गृहिणींचा विचार सुरू आहे. दुसरीकडे मंडळांमध्येही मंडप सजावट, बाह्य परिसरात विद्युत रोषणाई, मिरवणुकीत तयारी अशा कामांमध्ये कार्यकर्ते गुंतले आहेत.
एकीकडे घराघरांमध्ये आराशीची तयारी सुरू असताना दुसरीकडे मंडळांमध्येही गणरायाच्या आगमनासाठीची लगबग सुरू होती. मांडव उभारणीनंतर प्रत्येक गल्ली, पेठेबाहेर स्वागत कमानी लावण्यात आल्या आहेत. शिवाय रस्त्यांच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवातील देखावे हे कोल्हापूरचे विशेष आकर्षण असते आणि हे देखावे काही दिवस तरी गुलदस्त्यात ठेवत मंडळाचे कार्यकर्ते देखाव्याच्या तयारीत गुंतले आहेत.
पावसाळा असूनही इतके दिवस दडी मारलेल्या पावसाने श्री गणेशाच्या आगमनाचा मुहूर्त धरला आणि सकाळपासूनच सरी कोसळू लागल्या. या सरी झेलतच कोल्हापूरकरांनी गणेशोत्सवाची खरेदी केली. संध्याकाळनंतर पावसाचा जोर जरा कमी झाल्याने यावेळी खरेदीला प्राधान्य देण्यात आले.
रस्ते झाले तुडुंब
शहराचा मध्यवर्ती परिसर आणि मुख्य बाजारपेठ असलेला महाद्वार रोड आणि पापाची तिकटी हा परिसर गर्दीने तुडुंब झाला होता. सणासाठी नवनवीन कपडे, गौरीचे अलंकार यांच्या खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू होती; तर पापाची तिकटी, गंगावेश म्हणजे गणेशमूर्ती घडविणाºया कुंभार बांधवांचा परिसर. येथेच झुरमुळ्या, तोरण, रेशमी पडदे, धूप, अगरबत्ती, फटाके, फुलांच्या कमानी, प्लास्टिकची फुले, गौरी-शंकरोबाच्या मांडणीसाठी स्टॅँड, हार, माळा, किरीट, गणपतीच्या हातातील आयुधे अशा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे रहदारी खोळंबली. शहरात ठिकठिकाणी मांडव उभारल्याने मुख्य रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात रहदारी खोळंबत होती.