मडिलगे खुर्द येथे शॉर्टसर्किटने आग; प्रापंचिक साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:57 PM2020-02-13T18:57:40+5:302020-02-13T18:58:15+5:30
या आगीमध्ये टी. व्ही. संच लाकडी,लोखंडी कपाटे, गादया, पलंग, मौल्यवान वस्तू,धान्य,कपडे घराचे संपूर्ण छप्पर जळून खाक झाले आहे.या आगीत हे कुटुंब उध्वस्त झाले आहे.या आगीत १६ लाख ७८हजारांचे नुकसान झाले आहे
गारगोटी- -
मडिलगे खुर्द ता.भुदरगड येथील बाजीराव बच्चाराम करडे यांच्या राहत्या घरात शॉर्टसर्किटने पहाटे ३ वाजता आग लागून अंदाजे १६ लाख ७८ हजारांचे प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तलाठी एफ आय भटारे आणि ग्रामसेविका रुपाली पाटील,महावितरणचे शाखा अभियंता अमित कुदळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
शुक्रवारी पहाटे शॉर्टसर्किटने घराच्या माळ्यावरील भागात अचानक आग लागली.घरातील माळ्यावर फळी असल्याने त्यांना ही आग लवकर लक्षात आली नाही.माळ्यावरची फळी जळून उजेड दिसल्यावर घरातील माणसे आरडाओरडा करत बाहेर पळाले. त्यावेळी घरातील माणसे शेजापाजारी उठले आणि सर्वजण आग विझवन्यासाठी धावू लागले. काही तरुणांनी जळत्या घरात घुसून जनावरांची दावी कापून बाहेर काढलीत.पण तोपर्यंत अग्नीने उग्र रूप धारण केल्याने धान्य,कपडे वाचवता आले नाही.
या आगीमध्ये टी. व्ही. संच लाकडी,लोखंडी कपाटे, गादया, पलंग, मौल्यवान वस्तू,धान्य,कपडे घराचे संपूर्ण छप्पर जळून खाक झाले आहे.या आगीत हे कुटुंब उध्वस्त झाले आहे.या आगीत १६ लाख ७८हजारांचे नुकसान झाले आहे नशिबाने सर्व माणसे तळमजल्यावर झोपल्याने जनावरे व माणसे सुखरूप बचावली. आग विजवन्यासाठी बिद्री कारखान्याचे अग्नीशामक दलाने आग विझवली. यावेळी सरपंच, पोलिसपाटील , ग्रामस्त, तरुण युवक मोठ्या संख्येने हजर होते.