कोल्हापूर : सामान्य माणूस न्यायापासून वंचित राहू नये, यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचावा. कायद्याबाबत जागृती निर्माण व्हावी, त्यासाठी सर्वांनीच कायदा जागृतीमध्ये सक्रिय व्हावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. लव्हेकर यांनी मंगळवारी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे विधी सेवा सप्ताहानिमित्त येथील शाहू स्मारक भवन येथे आयोजित विधी साक्षरता शिबिराच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने विधी साक्षरतेसाठी हाती घेतलेले जनजागृतीचे उपक्रम उपयुक्त आहेत. विधी सेवा रॅलीच्या नेटक्या नियोजनाबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सर्व सहभागी घटकांचे त्यांनी अभिनंदन केले.
पोलीस अधीक्षक संजय मोहिते म्हणाले, आपापसातील किरकोळ वाद, तंटे गावातच सामंजस्याने मिटविण्यासाठी पोलीस दल पुढाकार घेईल. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनीही मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट विधी स्वयंसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल सुषमा बटकडली यांचा डॉ. खेमनार यांच्या हस्ते सत्कार केला. प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी, तर ज्योती भालकर यांनी आभार मानले. यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल, आदींसह अधिकारी-कर्मचारी, वकील, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
ग्रंथालयाचे औपचारिक उद्घाटनजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने भारतात प्रथमच कोल्हापुरात तृतीय पंथियांसाठी ग्रंथालयाची स्थापना केली असून ते रिलायन्स मॉलपाठीमागे आहे. त्याचे औपचारिक उद्घाटन डॉ. खेमनार यांच्या हस्ते केले. जवळपास ४५० पुस्तके या ग्रंथालयासाठी दिनेश प्रभू, संजय पवार आणि जोशी यांनी उपलब्ध करून दिली आहेत.शहरात जनजागृती रॅलीविधी सेवा रॅलीचा प्रारंभ जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या हस्ते केला. बिंदू चौक ते शाहू स्मारक भवन अशी रॅली काढली. यात न्यायाधीश ए. यु. कदम, आर. एस. निंबाळकर, पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, सूरज गुरव, मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, अशोक रोकडे, अमर भोसले, मिलन मकानदार, राजेंद्र प्रभावळे यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील, आदींनी सहभाग घेतला.चोवीस तासात मोफत वकीलविधी सेवा प्राधिकरणाने महिला, मागासवर्गीय घटकांसाठी चोवीस तासात मोफत वकील देण्याची महत्त्वाची भूमिका घेतली आहे. कायदा साक्षरतेबरोबरच स्त्रीभ्रूण हत्या, रॅगिंग, आदींसह तृतीय पंथियांसाठी विशेष कार्य विधी सेवा प्राधिकरणाने हाती घेतले असल्याचे सचिव मोरे यांनी सांगितले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे विधी सेवा सप्ताहानिमित्त येथील शाहू स्मारक भवन येथे आयोजित विधी साक्षरता शिबिराचा प्रारंभ करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. लव्हेकर. डावीकडून ज्योती भालकर, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, डॉ. डी. टी. पवार, उमेशचंद्र मोरे उपस्थित होते.