म्हाकवेः निपाणी-देवगड या तीन वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या रस्त्यासाठी कागल तालुक्यातील आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांनी सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता अमित पाटील यांना धारेवर धरत लिंगनुर-कापशी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडण्यात आले. यावेळी अभियंता संभाजी माने यांना दूरध्वनीवरून नागरिकांनी संपर्क केला. मात्र, त्यांनी असमाधानकारक, बेजबाबदार आणि उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच भेटण्याची वेळही दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांचा पारा चढला असून शुक्रवार दि.२ रोजी गैबी चौकात ठिय्या आंदोलन व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना घेराव घालण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.
निपाणी-देवगड रस्त्याचे काम अर्धवटच राहिल्याने ऐन पावसाळ्यात प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून स्थानिक नागरिकांची कुचंबना होत आहे. लिंगनुरसह या मार्गावरील खडकेवाडा, सोनगे, कुरुकली, सुरुपली, मुरगुड, निढोरी, आदमापूर या गावातील स्थानिक नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे येथील नागरिक आक्रमक झाले आहेत.
सुमारे २२० कोटी रुपयांचा निधी मंजूर असणाऱ्या या रस्त्याचे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, झालेले कामही निकृष्ट आणि निरुपयोगी असल्याचे नागरिकांनी अधिका-यांना दाखवून दिले. यावेळी काॅ. शिवाजी मगदूम, सरपंच स्वप्निल कांबळे, माजी सरपंच मयूर आवळेकर, डॉ. प्रवीण जाधव, शिवाजी मेथे, हरिदास पोवार, नामदेव भोसले, तुषार किल्लेदार, जोतिराम मोगणे (हमिदवाडा), राजू आरडे (आणूर) संदेश जाधव, अविनाश पोवार, गुंडूराव आवळेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
अधिकारी, ठेकेदार समोर का येत नाहीत?
दोन वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर असून नागरिकांच्या जीवांशी खेळ सुरू आहे. तरीही वरिष्ठ अधिकारी आणि मुख्य ठेकेदार मनावर घेत नाहीत. उलट ही मंडळी नामानिराळे राहून कनिष्ठ अभियंत्यांवर जबाबदारी सोपवत आहेत. त्यामुळे दूरध्वनीवरून अभियंता संभाजी माने यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यांनी उद्धट बोलत बाजू झटकली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना याबाबत घेराव घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे काॅ. मगदूम यांनी सांगितले.