कोल्हापूर : दरवर्षी कॅरोल सिंगिगने नाताळचे स्वागत घरोघरी जाऊन केले जात होते. यंदा मात्र त्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फाटा देण्यात आला आहे. त्यामुळे नाताळच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई, शुभेच्छा संदेश, ख्रिसमस ट्री ची सजावट, आकाश कंंदीलाचा प्रकाश, अशा उत्साही वातावरणात पण साधेपणाने गुरुवारी मध्यरात्री ख्रिस्ती बांधवांनी नाताळ सणाचे स्वागत केले. प्रभू येशूंच्या जन्मदिनानिमित्त शुक्रवारी सकाळपासून वायल्डर मेमोरियल चर्चसह सर्व चर्चमध्ये सहा सत्रांमध्ये इंग्रजी व मराठी उपासना होणार आहे.ख्रिस्ती धर्मांमध्ये नाताळ सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी प्रभू येशूंचा जन्म झाल्याने त्यांचे स्वागत संपूर्ण घराची सजावट, विद्युत रोषणाईने रात्री बारा वाजता केक कापून केली जाते. शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजता वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये रेव्हरंड डी. बी. समुद्रे हे भक्ती, तर रेव्हरंड जे. ए. हिरवे हे संदेश वाचन करणार आहेत. रेव्हरंड सिनाय काळे हे उपासना करणार असून याकरिता सेशन कमिटीचे सदस्यही उपस्थित राहणार घेणार आहेत.
नऊ वाजून १५ मिनिटांनी कळंबा जेल येथे कैद्यांकरिताही विशेष उपासना केली जाणार आहे. त्यानंतर ९.४५, ११.१५ दुपारी १२.४५, दुपारी ३ अशा विविध सत्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थना सत्र आयोजित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून शहरातील पापाची तिकटी, पानलाईन, महाद्वार रोड, राजारामपुरी, ताराबाई पार्क, आदी ठिकाणच्या बाजारपेठेत लहान, मोठ्या आकाराचे ख्रिसमस ट्री, जिंगलबेल्स, चांदण्या, सांताक्लॉजचे शर्ट, शुभेच्छापत्रे, सांताक्लॉजची टोपी, कपडे, चॉकलेटस अशाने बाजारपेठ फुलली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चर्चमध्ये दरवर्षीप्रमाणे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.