कोल्हापूर: लग्नकार्याच्या गडबडीत नातेवाईकांची नजर चुकवून ननंदेने माहेरच्या घरात भावजयीच्या नऊ तोळे दागिन्यांवर डल्ला मारला. चोरीतील एक सोन्याची पाटली मित्राकरवी विक्रीसाठी दिल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत जुना राजवाडा पोलिसांनी अवंती शैलेश शिंदे (वय ३३, रा. रविवार पेठ) आणि तिचा मित्र विशाल विष्णूपंत शिंदे (वय ३८, दोघे रा. रविवार पेठ, कोल्हापूर) यांना सोमवारी (दि. ११) अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील पाच लाख ११ हजार रुपये किमतीचे नऊ तोळे दागिने पोलिसांनी हस्तगत केले.
जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुपाली सौरभ पिंजारे (वय २९, रा. ताराबाई रोड, शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांच्या घरी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लग्न समारंभाची गडबड सुरू होती. पैपाहुण्यांची वर्दळ सुरू असताना घरातील लाकडी कपाटातील दागिने चोरीला गेल्याचे रुपाली यांच्या लक्षात आले. घरात शोध घेऊन आणि नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतरही दागिने सापडत नसल्याने त्यांनी पाच फेब्रुवारीला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चोरी झालेल्या काळात घरात वावर असलेल्या नातेवाईकांचे मोबाइल कॉल डिटेल्स काढून पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. त्यात फिर्यादी रुपाली यांची ननंद अवंती हिच्यावर संशय बळावला.
दरम्यान, अवंती हिचा मित्र विशाल शिंदे हा चोरीतील सोन्याची पाटली विक्रीसाठी गुजरीत आला असता पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याची पाटली जप्त केली. शिंदे याच्या चौकशीत अवंती हिचे नाव येताच चोरीचा उलगडा झाला. तिच्या घरझडतीत पोलिसांना चोरीतील नेकलेस, झुबे, दोन अंगठ्या, राणीहार मिळाला. दोन्ही संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केेले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह सागर डोंगरे, गजानन गुरव, परशुराम गुजरे, प्रशांत घोलप, सतीश बांबरे, सारिका खोत, भाग्यश्री वावरे यांच्या पथकाने गुन्ह्याचा उलगडा केला.
दोन्ही कुटुंबांना धक्का
ननंदेनेच भावजयीचे दागिने चोरल्याचा प्रकार उघडकीस येताच अवंती शिंदे हिचे माहेर आणि सासरच्या कुटुंबीयांना धक्का बसला. आर्थिक परिस्थिती सुस्थितीत असतानाही तिला घरातच चोरीची दुर्बुद्धी का सुचली असावी? असा प्रश्न नातेवाईकांना पडला.